महाराष्ट्र न्यूज टाईम्ससाठी बातमी:
छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी : ठाणे जिल्ह्यातील कल्याण-वालधुनी परिसरातील बुद्ध विहार व बुद्धमूर्ती पाडल्याच्या घटनेचा निषेध करण्यासाठी पँथर्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने गुरुवारी क्रांती चौकात तीव्र निदर्शने करण्यात आली. पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली.
पँथर्स रिपब्लिकन पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा प्राचार्य सूर्यकांता गाडे आणि प्रदेशाध्यक्ष डॉ. सिद्धांत गाडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले. वालधुनी येथील बौद्ध समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या बुद्ध विहाराच्या पाडकामामुळे समाजात तीव्र संतापाची लाट उसळली असून, त्याविरोधात हे आंदोलन करण्यात आल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.
यानंतर पक्षाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सादर केले. बुद्ध विहार पाडणाऱ्या दोषींवर तातडीने कठोर कारवाई करावी, तसेच अनुसूचित जाती उपवर्गीकरणाचा निर्णय रद्द करावा, अशा प्रमुख मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
राज्य सरकारने या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही तर राज्यभर अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला.
या आंदोलनात मराठवाडा अध्यक्ष सर्जेराव मनोरे, मराठवाडा संघटक साहेबराव नवतुरे, शहराध्यक्ष प्रवीण गाडेकर, शिरीष जाधव, राहुल तुरेराव, नितीन गांगुर्डे, राजेश पवार, निलेश हरणे, शैलेंद्र तुपे, दादाराव लोखंडे, ज्ञानेश्वर जाधव, गोपाल पाटील, सिद्धार्थ पैठणे, राकेश साबळे, लताबाई थोरात, अमोल नरवडे, सुनील जाधव, राजआनंद सुरतकर, मुक्तार भाई यांच्यासह महिला व पुरुष कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

