जिल्ह्यात विकास करण्यासाठी शासन स्तरावर विविध निर्णय घेतले जातात. नियोजन, धोरणं यानुसार निधी देणं शासनाचं काम आहे आणि त्यावर प्रत्यक्ष अंमलबजाणी करण्याचं काम जिल्हा प्रशासन आणि विविध विभाग तसेच यंत्रणा यांचं असतं.
बीड जिल्हा हा मुख्यत्वे कृषीप्रधान जिल्हा. येथे मोठे उद्योग नाहीत त्यामुळे युवकांच्या हाताला रोजगार मिळणं कठीण आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने घेतलेले निर्णय आणि त्याची अंमलबजावणी यामुळे बीड जिल्ह्याचं चित्र आता झपाट्याने बदलत आहे.
जिल्ह्यात संपर्क अर्थात दळणवळण साधनांची कमतरताही खूप मोठी समस्या होती. त्यात आता धुळे – सोलापूर महामार्ग झाल्याने खूप मोठा बदल झाला आहे. विभागीय मुख्यालय असणाऱ्या छत्रपती संभाजीनगर येथे जाण्यासाठी पूर्वी लागणारा 3 ते 3.30 तासांचा कालावधी हा या महामार्गामुळे 2 तासांवर आलाय.
दुसऱ्या बाजूला जिल्ह्याचा अधिक संपर्क नजिकच्या अहिल्यानगर जिल्ह्याशी आहे आणि व्यापार देखील याच दिशेने होतो. या दोन्ही मार्गांच्या प्रगतीने आता शंतकऱ्यांना बाजारपेठ जवळ आली आहे.
रेल्वेचं स्वप्न साकार
गेल्या तीन पीढ्या रेल्वे बीडमध्ये यावी हे स्वप्न बाळगून होत्या. दिवंगत मुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांनी ज्यावेळी जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची सुत्रं हाती घेतली त्यावेळी त्यांनी या कामाला गती दिली. आज अजिदादांच्या दुरद्ष्टीतून बीड अमुलाग्र बदलतांना दिसेल आणि याला दादांच्या सुविद्य पत्नी सुनेत्राताई पवार यांनी पुढे नेण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
दादांच्या उपस्थितीत बीडकरांचं रेल्वेचं स्वप्न पूर्ण झालं. अहिल्यानगर बीड रेल्वे मार्गाचं काम पूर्ण झालं आणि रेल्वे बीडला पोहोचली. आता याचा पुढील टप्पा बीड- परळी रेल्वेमार्गाचा आहे. या कामाला गती देण्यात आली असून याचा दैनंदिन पातळीवर आढावा आणि पाठपुरावा होत आहे.
रेल्वे मार्ग उभारणी यासाठी केंद्र आणि राज्य असा संयुक्त प्रकल्प असल्यामुळे समन्वयाचा भाग खूप मोठा असतो तो समन्वय राखून जिल्हा प्रशासनाने बीड ते वडवणीचे काम पूर्ण करून घेतले आहे.आणि यामार्गावर जलदगती रेल्वे चाचणी देखील पूर्ण झाली आहे.
वडवणी ते परळी या उर्वरित टप्यामनचे कामही वेगात सुरू असून 20 पैकी 12 गावांची भूसंपादन प्रक्रिया अंतिम निवाडा टप्यामनवर आहे व 8 गावांची कामे प्रारूप आराखडा स्थितीत आहे. याला गती देण्यात आली आहे. या मार्गाचे काम पूर्ण होण्यापूर्वी बीड ते मुंबई रेल्वे सुरू करण्याबाबतही समन्वय सुरू आहे. त्यामुळे बीडच्या विकासाचा महत्वाीीचा टप्पा पूर्ण होईल. बीड आता रेल्वे मार्गानेही देशात जोडले गेल्याने आगामी काळात बीडच्या विकासाची गती निश्चितच वाढेल असेच चित्र आहे.
– प्रशांत दैठणकर
9823199466

