सकाळी प्रार्थना झाली. सगळे मुलं आपल्या आपल्या वर्गात गेले आणि मी ऑफिसमध्ये येऊन बसले. दिवसभराचे कामकाज या विषयी विचार करत असतानाच एक शिक्षक धावत ऑफिसमध्ये येऊन म्हणाले, “मॅडम, वर्गात चला, मुलं भांडतायेत.” आत्ताच तर मुलं वर्गात गेली, इतक्या वेळात काय झालं असेल? हाच विचार करत मी वर्गाकडे पळाले. मी वर्गात गेले तोपर्यंत भांडणारी मुलं शांत झाली. भांडणाचे कारण विचारले तर म्हणे, एका मुलाला वर्गात येत असताना चुकून एका मुलाचा धक्का लागला आणि त्या मुलाला राग येऊन त्याने मारायला सुरुवात केली. इतकं साधं कारण भांडणाचं!! मुलांना समजावून सांगून, त्यांना शांत करून, दोन समजुतीच्या गोष्टी सांगून मी परत ऑफिसमध्ये आले. पण सारखा एकच विचार सतत त्रास देत होता की, इतकं साधं कारण असताना ही मारामारी का?
या अलीकडच्या काही वर्षांत हे असं सातत्याने घडत होतं. शिक्षकांची एनर्जी मुलांना समजावून सांगण्यात आणि शांत बसवण्यात जात होती. खरंच का बरं विद्यार्थी इतके हिंसक होत असतील? खरं तर शैक्षणिक क्षेत्रात २२/२३ वर्षांपासून काम करत आहे. विद्यार्थ्यांचे हे बदललेले रूप अलीकडच्या काळात जरा जास्तच जाणवायला लागलं. छोट्या-छोट्या गोष्टीवरून हिंसक होणं.प्रत्येक गोष्टीत आपल्यालाच महत्त्व दिलं जावं ही भावना,लगेच अहंकार दुखावायला जाणं,लगेच राग येऊन टोकाचे पाऊल उचलणे, शिक्षकांविषयीचा आदर कमी होणं, खेळाडूवृत्तीची कमतरता, हरणं किंवा मागे पडणं याचा लवकर स्वीकार न करणं, छोट्या छोट्या गोष्टीत मी कसा श्रेष्ठ हे दाखवण्याचा प्रयत्न करणं, असे अनेक प्रश्न सतत निर्माण होतात.आणि हे सगळं निभावून नेताना शिक्षकांचा मात्र कस लागतो.अर्थात सगळेच विद्यार्थी असे नसतात, पण मात्र वाढतं प्रमाण चाललंय.एक संचालिका आणि मुख्याध्यापक म्हणून याची कारणं आणि उपाय याचा विचार करू लागले.हे कसं आपल्याला थांबवता येईल? किंवा थोडेफार प्रमाण कसे कमी केले जाईल.याचा विचार करू लागले.विद्यार्थ्यांमध्ये चिडचिड, आक्रमकता, मारामारी, अपशब्द, धमकी देणे किंवा दुसऱ्याला दुखावणे यासारखे वर्तन जर वाढताना दिसतेय, यामागे एकच कारण नसते. यावर घर, शाळा, मित्र परिवार, सोशल मीडियाचा अति वापर आणि मुलांच्या भावनिक गरजा या सगळ्यांचा परिणाम होतो.घर मुलांसाठी सगळ्यात सुरक्षित जागा असते. मग घरातील वातावरणाचा प्रभाव हा मुलांवर होतो का? तर हो! १००% होतोच.घरात जर सतत वाद होत असतील, कठोर बोलले जात असेल.सतत आरडाओरड होत असेल, कुणासोबत तुलना केली जात असेल किंवा कठोर शिस्त लावली जात असेल, संवादाची कमतरता असेल, अतिस्पर्धा आणि अपेक्षांचा ताण असेल, गुण, करिअर आणि सतत “तू अजून चांगले केले पाहिजेस” हा दबाव असेल तर मुलगा नक्कीच आक्रमक होतो.एकटेपणाची भावना असेल, राग, दुःख, अपमान किंवा निराशा व्यक्त न करता येणे, भावना व्यक्त करण्याची क्षमता कमी असणे. मुलांना ऐकून घेण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी पालकांना वेळ कमी असणे, ही अशी एक ना अनेक कारणं असू शकतात.मग यातून मुलगा हा सोशल मीडियाकडे आकर्षित होतो आणि तिथेच रमायचा प्रयत्न करू लागतो… मग हळूहळू गप्पा, हिंसक दृष्ट्या गेम्स या जाळ्यात अडकत जातो.हिंसेलाच मजा आणि स्टाईल मारण्याची प्रवृत्ती वाढत जाते.काही मुलांना आक्रमक वर्तनातून लोकप्रियता मिळते असे वाटते. सगळ्यांचे लक्ष आपल्याकडे वेधण्याचा तो प्रयत्न करू लागतो. असे वागून मी किती मोठा, माझे किती फॉलोवर्स आणि किती लाइक्स मिळतात या धडपडीत मनाचे संतुलन बिघडवून घेतो.तर पालकांनो, तुम्ही जर मुलांसोबत वेळ घालवला, त्यांच्याशी विविध विषयावर चर्चा केली. मुलांना खेळाची आवड निर्माण करून तुम्ही पण जर कधी मुलांसोबत खेळलात तर त्यांच्यात खेळाडूवृत्ती निर्माण होईल.आणि त्यांना सोशल मीडियापासून थोडे तरी दूर ठेवण्यात यश येईल.तुमची भावनिक जवळीकता खूप महत्त्वाची,संस्कार महत्त्वाचे,शाळा आणि एक शिक्षक म्हणून जर विचार केला तर शाळेमध्ये फक्त पुस्तकी ज्ञानासोबतच भावनिक शिक्षण देता यावे, जसे की अभ्यासासोबतच रागावर नियंत्रण कसे ठेवावे, संवाद कसा साधावा,इतरांविषयी सहानुभूती कशी दाखवावी, मतांचा आदर कसा करावा,हे शिकवावे.
कारण शिक्षक हा फक्त विषय शिकवणारा नसून तर विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा शिल्पकार असतो. त्यामुळे शिक्षक म्हणून आपली काही जबाबदारी असते.जसे की विद्यार्थ्याला अपमानित न करता शिस्त लावणे,प्रत्येक मुलाला सुरक्षित वातावरण देणे. गुंडगिरी, छेडछाड आणि सामूहिक हिंसा कडे दुर्लक्ष न करणे. क्लासमध्ये सहानुभूति, सम्मान, टीमवर्क आणि संवाद यांना महत्त्व देणे,हिंसक वर्तनामागचे कारण समजून घेणे,पालकांशी नियमित संवाद ठेवणे. वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये सहभागी करून घेणे, गंभीर किंवा वारंवार हिंसक वर्तन दिसल्यास योग्य समुपदेशन व तज्ज्ञांची मदत घेणे.मातृ-पितृभक्ती, देशभक्ती तसेच आत्म-सम्मान बद्दल जागरूकता निर्माण करणे. मुलांशी योग्य संवाद ठेवणे.आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुलांना शिक्षा करण्यापेक्षा त्याला समजून घेणे आणि योग्य दिशा देणे अधिक महत्त्वाचे आहे.मुलाला फक्त “मारू नकोस” असे समजून सांगणे पुरेसे नसून, त्याला राग आला की काय करायचे हे शिकवणे महत्त्वाचे. तर पालकांनो, पालक आणि शिक्षकांनी एकमेकांवर दोष न देता आपण दोघे मिळून या मुलाला सुरक्षित, संवेदनशील आणि जबाबदार व्यक्ती कसे बनवू? हा प्रश्न विचारला पाहिजे.कारण हिंसक मुल जन्माला येत नाही. अनेकदा ते परिस्थितीतून हिंसक वागायला शिकते आणि त्याचप्रमाणे प्रेम, संवाद, शिस्त आणि योग्य मार्गदर्शनातून ते पुन्हा संवेदनशील व्हायलाही शिकू शकते. भेटू या परत!!
डॉ. योगिता सुधीर शास्त्री
Little Angels English School
9371540246


