बिडकीन | प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्ह्यातील बिडकीन पोलिसांनी दरोड्याच्या तयारीत असलेल्या तिघा संशयितांना अटक करून मोठी कारवाई केली आहे. ही कारवाई ४ जुलै २०२६ रोजी पहाटे बिडकीन DMIC परिसरातील सेक्टर क्र. १९, शिवनाई शिवार येथे करण्यात आली. पोलिसांनी आरोपींकडून सुमारे ₹५,२०,८४० किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींविरुद्ध BNS कलम 310(4), 310(5) तसेच कलम 135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओमधून काही जण दरोड्याच्या तयारीत फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सापळा रचून वाहन थांबविण्याचा प्रयत्न केला असता चालकाने वेगाने पळ काढला. काही अंतरावर वाहन अडविल्यानंतर दोन आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले, तर तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये रईस शेख शहीर (वय ३२), अमोल काशीनाथ खरात (वय ३०) आणि रईस शेख युनूस (वय ३२), सर्व रा. अजवा नगर, वाळूज यांचा समावेश आहे.
कारवाईदरम्यान पोलिसांनी एक स्कॉर्पिओ वाहन, दोन मोबाईल हँडसेट, लोखंडी कटर, दोर, हॅक्सा ब्लेडसह दरोड्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य असा ₹५.२० लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
तपासात अटक आरोपींपैकी रईस शेख शहीर व अमोल काशीनाथ खरात यांच्याविरुद्ध वाळूज, MIDC वाळूज आणि मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात चोरी, फसवणूक, घरफोडी, दरोड्याच्या तयारीसह विविध गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे पूर्वीपासून दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरनार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बिडकीन पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश शेळके, पोलीस उपनिरीक्षक मनोज पाटील व त्यांच्या पथकाने केली.

