शिक्षक पतीसह सासरच्या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल
छत्रपती संभाजीनगर : चारचाकी वाहन खरेदीसाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत, या मागणीवरून एका २५ वर्षीय विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याचा गंभीर प्रकार शहरात उघडकीस आला आहे. या छळामुळे विवाहितेचा गर्भपात झाल्याचा आणि तिला ब्रेन स्ट्रोक आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी शिक्षक पतीसह सासरच्या पाच जणांविरुद्ध छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, संबंधित विवाहितेचा विवाह ५ एप्रिल २०२६ रोजी झाला होता. लग्नानंतर काही दिवसांतच सोन्याची साखळी न दिल्याच्या कारणावरून तिला टोमणे मारणे आणि मानसिक त्रास देणे सुरू झाल्याचा आरोप आहे. पुढे चारचाकी वाहनासाठी पाच लाख रुपयांची मागणी करण्यात आली. ही मागणी पूर्ण न केल्यास दुसरे लग्न करण्याची धमकी देण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद आहे.
तक्रारीनुसार, विवाहितेला मारहाण करणे, घरकामासाठी त्रास देणे आणि पुरेसे अन्न न देणे, असे प्रकारही घडल्याचा आरोप आहे. गर्भवती असताना वैद्यकीय तपासणी व उपचारांसाठी सहकार्य करण्यात आले नाही, असेही तिने तक्रारीत म्हटले आहे.
दरम्यान, २३ ऑगस्ट २०२६ रोजी तिचा गर्भपात झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यानंतर खासगी रुग्णालयात उपचार घेत असताना तिला ब्रेन स्ट्रोक आल्याचे निदान झाल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.
या प्रकरणी पती सुमित मगरे, सासू, सासरे, नणंद आणि दीर अशा पाच जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
वरील प्रकरणातील आरोप तक्रारीवर आधारित असून, त्यांची न्यायालयीन पडताळणी होणे बाकी आहे.



