परतूर येथे हॉटेल व्यवसायाच्या आड बदलले होते अस्तित्व; गोपनीय माहितीच्या आधारे घेतले ताब्यात
पाचोड : मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यात मागील तब्बल १४ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला अखेर पकडण्यात पाचोड पोलिसांना यश आले आहे. जालना जिल्ह्यातील परतूर येथे हॉटेल व्यवसाय सुरू करून राहत असलेल्या आरोपीला पोलिसांनी साध्या वेशात कारवाई करत ताब्यात घेतले.
पाचोड पोलीस ठाण्यात सन २०१२ मध्ये डॉ. ठोके यांनी मोटारसायकल चोरीबाबत तक्रार दाखल केली होती. या गुन्ह्यातील दोन आरोपींना यापूर्वीच अटक करण्यात आली होती. मात्र, सोनेसिंग प्रेमसिंग टाक (रा. शिवाजी चौक, जालना) हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता. गेल्या १४ वर्षांपासून पोलीस त्याचा शोध घेत होते. आरोपीने आपले अस्तित्व बदलून वास्तव्य केल्याने तो पोलिसांच्या हाती लागत नव्हता.
दरम्यान, २६ ऑक्टोबर २०२६ रोजी विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्रा यांनी गुन्हे आढावा बैठकीत फरार आरोपींचा शोध घेण्याबाबत सक्त सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव आणि अपर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी यांनी विशेष पथक नेमून फरार आरोपींना अटक करण्याच्या सूचना दिल्या.
प्रभारी अधिकारी तथा सहायक पोलीस निरीक्षक सचिन पंडित यांनी पथक जालन्याकडे रवाना केले. दोन दिवस परिसरात मुक्काम करून शोधमोहीम राबविण्यात आली. यावेळी गोपनीय अंमलदार संदीप जाधव यांना आरोपी सुमारे दहा वर्षांपूर्वी परतूर परिसरात कामानिमित्त गेला असल्याची माहिती मिळाली.
या माहितीच्या आधारे गोपनीय अंमलदार संदीप जाधव, मनोज वैद्य आणि होमगार्ड गोविंद शेळके यांनी परतूर परिसरात शोध घेतला. तेव्हा आरोपीने तेथे ‘सैराट २ ढाबा’ नावाने हॉटेल सुरू केल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी साध्या वेशात संबंधित हॉटेलवर छापा टाकून आरोपीला ताब्यात घेतले. पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी त्याला पाचोड पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे.
या पथकाची कामगिरी
पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी आणि पैठण उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सचिन पंडित, गोपनीय अंमलदार संदीप जाधव, मनोज वैद्य आणि होमगार्ड गोविंद शेळके यांनी ही कारवाई केली.



