छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी
जमिनीचा फेर मंजूर करून देण्यासाठी ₹20 हजारांच्या लाचेची मागणी करून तडजोडीनंतर ₹10 हजारांची रक्कम ऑनलाइन (फोनपे) स्वीकारणाऱ्या मंडळ अधिकाऱ्याच्या खासगी मदतनीसासह आणखी एका व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ ताब्यात घेतले. ही कारवाई 7 जुलै रोजी सिल्लोड येथील कोहिनूर कापड दुकानासमोर करण्यात आली.
या प्रकरणी पोलीस निरीक्षक भास्कर नवले यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे. आरोपींमध्ये अमोल श्रीरंग बडक (वय 28, रा. चिंचपूर, ता. सिल्लोड) हा मंडळ अधिकाऱ्याचा खासगी मदतनीस असल्याचा आरोप असून, सचिन काशिनाथ बडक (वय 29, रा. चिंचपूर, ता. सिल्लोड) याचाही समावेश आहे.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, 43 वर्षीय तक्रारदार यांनी मौजे चिंचपूर येथील गट क्रमांक 123 मधील दोन गुंठे जमीन खरेदी केल्यानंतर फेर मंजुरीसाठी तलाठी सजा कार्यालय, पालोद येथे अर्ज केला होता. संबंधित फेर मंडळ अधिकाऱ्यांकडे प्रलंबित असल्याने तक्रारदारांनी चौकशी केली असता, फेर मंजूर करून देण्यासाठी मंडळ अधिकाऱ्यांना ₹20 हजार द्यावे लागतील, अशी मागणी खासगी मदतनीस अमोल बडक याने केल्याची तक्रार 6 जुलै रोजी एसीबीकडे करण्यात आली.
तक्रारीची पंचासमक्ष पडताळणी करण्यात आल्यानंतर लाचेची मागणी झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर झालेल्या तडजोडीत ₹20 हजारांऐवजी ₹10 हजार स्वीकारण्याचे ठरले. ही रक्कम आरोपी सचिन बडक यांच्या फोनपे खात्यावर स्वीकारण्यात आली. त्याचवेळी सापळा पथकाने दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले.
कारवाईदरम्यान दोन्ही आरोपींकडील मोबाईल फोन जप्त करण्यात आले असून त्यांचे तांत्रिक विश्लेषण सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक धर्मराज बांगर करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक माधुरी केदार कांगणे, अपर पोलीस अधीक्षक शशिकांत सिंगारे आणि पोलीस उपअधीक्षक प्रशांत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भास्कर नवले यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली.
दरम्यान, कोणत्याही शासकीय अधिकारी, कर्मचारी किंवा त्यांच्या वतीने काम करून देण्यासाठी कायदेशीर शुल्काव्यतिरिक्त लाचेची मागणी होत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या टोल-फ्री क्रमांक 1064 किंवा व्हॉट्सॲप क्रमांक 7720891064 वर संपर्क साधावा, असे आवाहन विभागाने केले आहे.
टीप : ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या माहितीनुसार करण्यात आली असून, आरोपींवरील आरोप न्यायालयात सिद्ध होणे बाकी आहे.

