पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ केले जाणार आहे. त्यासाठीची कागदपत्रांची पडताळणी, पात्रता निकषांप्रमाणे लाभार्थ्यांची माहिती संकलित करणे इ. कार्यवाही सुरु झाली आहे. शेतकरी बंधू भगिनींनी एक बाब लक्षात घेतली पाहिजे की, आपण ज्या संस्थेमार्फत कर्ज घेतले आहे, त्या विविध कार्यकारी सेवा सोसायटी, बॅंका, सहकारी बॅंक, कृषी पतसंस्था इ. मार्फत आपल्या कर्जमुक्तीची प्रक्रिया सुरु आहे. त्यामुळे आपणास या कर्जमुक्तीसंदर्भात हवी असलेली सर्व माहिती व आवश्यक प्रक्रिया ही तेथेच होईल. त्यामुळे चुकीची, अनावश्यक व दिशाभूल करणाऱ्या माहितीपासून आपण सावध असणे आवश्यक आहे.
ही कार्यपद्धती पूर्णपणे सुलभ, पारदर्शक आहे. त्यासाठीची सर्व प्रक्रिया संबंधित बॅंका वा ज्या संस्थेमार्फत कर्ज घेण्यात आले आहे त्या संस्थेमार्फत राबविली जाणार आहे. शेतकऱ्यांनी फक्त त्या संस्थेने मागणी केल्यानुसार कागदपत्रे वेळेत द्यावयाची आहेत. संबंधित बँकेकडे असलेली शेतकऱ्यांची माहिती अद्ययावत असणे आवश्यक आहे.
शेतकऱ्यांनी संबंधित बँकेतून आपला कर्ज खात्याचा तपशील तपासावा. कर्जाचा प्रकार, कर्जाची रक्कम, खाते क्रमांक, आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक इ. नोंदी बरोबर असल्याची खात्री करावी.
आधार कार्ड, आधार क्रमांकाशी संलग्न बॅंक खाते क्रमांक,मोबाईल क्रमांक, बँक पासबुक, कर्ज खात्याचा तपशील, कर्ज खाते क्रमांक, सातबारा उतारा (७/१२), आवश्यकतेनुसार आठ-अ उतारा (८अ), ॲग्रीस्टॅक नोंदणीची माहिती, ई-केवायसी पूर्ण झाल्याची नोंद इ.
आधार प्रमाणीकरण आणि ॲग्रीस्टॅक नोंदणी या दोन बाबी अत्यंत आवश्यक आहेत. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ॲग्रीस्टॅकवर नोंदणी केली नाही, त्यांनी ती तातडीने पूर्ण करावी. तसेच आधारशी जोडलेला मोबाईल क्रमांक हाच बॅंकेशी जोडलेला असावा याची खात्री करण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी.
ही सर्व प्रक्रिया संबंधित बँका आणि शासनाच्या यंत्रणांकडून पुर्ण केली जाईल. पात्र कर्ज खात्यांची पडताळणी केली जाईल. माहितीची छाननी करून पात्र लाभार्थ्यांची यादी तयार करण्यात येईल.
शेतकऱ्यांनी आपल्या बँकेशी नियमित संपर्क ठेवावा. बॅंकेकडून प्राप्त माहितीवर विश्वास ठेवावा. बॅंकेतच आवश्यक कागदपत्रे द्यावीत. अन्य कुणाही व्यक्तीस वा दलालास आपली कागदपत्रे देऊ नये. कोणत्याही अफवा किंवा अवैध संदेशांवर विश्वास न ठेवता शासन, संबंधित बँका, कृषी विभाग आणि महसूल यंत्रणेकडून देण्यात येणाऱ्या अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्यावे.
-संकलनः जिल्हा माहिती कार्यालय, छत्रपती संभाजीनगर.

