छत्रपती संभाजीनगर दि, १४(प्रतिनिधी)-कचरा व्यवस्थापन आता केवळ स्वच्छतेचे काम न राहता एक फायदेशीर ‘हरित उद्योग’ (Green Business) बनला आहे. शासनाच्या अमृत संस्थे मार्फत लक्ष्यित गटातील पात्र उमेदवारांना उद्योग उभारणीसाठी विशेष अनुदान आणि व्याज परतावा योजनेचा लाभ मिळणार आहे. ‘अमृत’ (महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी) आणि ‘कुशाग्र इनोव्हेशन्स फाउंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने “अमृत-सक्षम” हा विशेष उद्योजकता विकास उपक्रम महाराष्ट्रात राबवला जात आहे. याचा तरुण उद्योजकांनी लाभ घेण्याचे आवाहन छत्रपती संभाजीनगर जिल्हा अमृत कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.
या उपक्रमांतर्गत कचऱ्यापासून उत्पन्न मिळवण्याचे तंत्र, सुकलेल्या फुलांपासून अगरबत्ती निर्मिती, प्लास्टिक-कागद रिसायकलिंग आणि रिसोर्स रिकव्हरी सेंटर (RRR) सुरू करण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. हा केवळ प्रशिक्षणाचा कार्यक्रम नसून, संकल्पनेपासून ते प्रत्यक्ष उद्योग उभारणीपर्यंतचा संपूर्ण प्रवास आहे.
कोणत्याही पूर्वानुभवाची गरज नसलेले युवक-युवती, महिला बचत गट, व्यावसायिक, निवृत्त कर्मचारी आणि सामाजिक संस्था या उपक्रमात सहभागी होऊ शकतात. अमृतच्या लक्ष्यित गटातील पात्र उमेदवारांना उद्योग उभारणीसाठी विशेष अनुदान आणि व्याज परतावा योजनेचा लाभही मिळणार आहे.
इच्छुक उमेदवारांनी https://amrut-saksham.mahaamrut.org.in/ या संकेतस्थळावर नोंदणी करावी. या व्यवसायाबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी १६ जुलै २०२६ रोजी दुपारी ४ वाजता’AMRUT’ च्या युट्युब चॅनेलवर(https://youtube.com/@mahaamrutpune?si=JZPTLSS9H9bPvnOf) होणाऱ्या लाईव्ह सत्रात सहभागी होण्याचे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे. संपर्कासाठी ७३९१०६५४७५ आणि ९४०३२००६०६या फोन नंबर वर फोन करावा.तसेच
विभागीय व जिल्हा कार्यालय अमृत, पुंडलिक नगर रोड, सेक्टर-४ सिडको, पाण्याच्या टाकीजवळ, छत्रपती संभाजीनगर येथे संपर्क साधावा असे आवाहन प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.

