फळपीक विम्यासाठी १४ जुलैपर्यंत मुदतवाढ हवामानाच्या जोखमीपासून संरक्षणासाठी शेतकऱ्यांना दिलासा; मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन
छत्रपती संभाजीनगर, दि. ३ : प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांना मोठा दिलासा देत संत्रा, मोसंबी, डाळिंब, चिकू, पेरू, लिंबू, द्राक्ष आणि हळद या पिकांसाठी विमा भरण्याची अंतिम मुदत १४ जुलै २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे. शासनाची मंजुरी उशिरा मिळाल्यामुळे ही मुदतवाढ देण्यात आली असून, अधिकाधिक शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभागीय कृषि सहसंचालक सुनिल वानखेडे यांनी केले आहे.
सन २०२६-२७ या वर्षासाठी छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यांमध्ये ही योजना लागू करण्यात आली आहे. हवामानातील प्रतिकूल बदलांमुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानीपासून फळबागांचे संरक्षण करण्यासाठी ही योजना महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
शेतकरी पीक विमा पोर्टलद्वारे स्वतः, आपले सेवा केंद्र, विमा प्रतिनिधी किंवा बँकेच्या माध्यमातून अर्ज करू शकतात. योजनेत कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक सहभागाची संधी असून, डिजिटल पीक सर्वेक्षण (DCS), AgriStack Farmer ID, आधार संलग्न बँक खाते आणि फळबागेचे जिओ-टॅगिंग अनिवार्य करण्यात आले आहे.
योजनेअंतर्गत कमी पाऊस, पावसाचा खंड, अतिवृष्टी, जास्त तापमान, आर्द्रता आदी हवामान धोक्यांपासून विमा संरक्षण मिळणार असून, अधिसूचित हवामान केंद्रांवरील नोंदीच्या आधारे नुकसानभरपाई अदा करण्यात येणार आहे.
संत्रा, मोसंबी, डाळिंब, चिकू, पेरू, लिंबू, द्राक्ष व हळद उत्पादक शेतकऱ्यांनी १४ जुलैपूर्वी, तर सिताफळ उत्पादकांनी ३१ जुलैपूर्वी विमा योजनेत सहभागी होऊन या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक, छत्रपती संभाजीनगर यांनी केले आहे.

