छत्रपती संभाजीनगर, दि. १२ जून : शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थेला बाधा आणणाऱ्या आणि पाणी चोरीस कारणीभूत ठरणाऱ्या अनधिकृत नळ जोडण्यांविरोधात छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने मोठी धडक कारवाई करत शंभूनगर परिसरातील १५० मिमी उपजलवाहिनीवरील तब्बल ९६ अनधिकृत नळ जोडण्या खंडित केल्या.
मनपा आयुक्त अमोल येडगे यांच्या आदेशानुसार त्रिशरण चौकाजवळील शंभूनगर परिसरातून गादिया विहारकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पुलावरून जाणाऱ्या उपजलवाहिनीवर ही विशेष मोहीम राबविण्यात आली. या कारवाईमुळे शहरातील पाणी चोरीवर आळा बसण्यास मदत होणार असून अधिकृत नळधारकांना नियमित व पुरेसा पाणीपुरवठा मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
अतिरिक्त आयुक्त-२ कल्पिता पिंपळे यांच्या मार्गदर्शनाखाली व पथक अभियंता रोहित इंगळे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. यावेळी मनपाचे अधिकारी, कर्मचारी तसेच पोलीस प्रशासनाचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
दरम्यान, शहरातील किराडपुरा, बाजीपुरा, रोशन गेट, नारेगाव, सिद्धार्थ नगर, आंबेडकर नगर यांसह अनेक भागांमध्येही अशाच प्रकारच्या अनधिकृत नळ जोडण्या असल्याची चर्चा नागरिकांमधून होत आहे. संबंधित परिसरातील नागरिकांनी प्रशासनाने या भागांमध्येही विशेष तपासणी मोहीम राबवावी, अशी मागणी केली आहे.
तसेच अनेक भागांत पाणीपुरवठा साधारण दोन ते अडीच तास सुरू राहतो. मात्र मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यांवर व नाल्यांमध्ये वाया जात असल्याचे चित्र दिसून येते. त्यामुळे पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी गळती, अनधिकृत जोडण्या आणि पाणी वाया जाणाऱ्या ठिकाणांची तपासणी करून तातडीने उपाययोजना करण्याची गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
शहरातील प्रत्येक अधिकृत ग्राहकापर्यंत पुरेसे पाणी पोहोचावे आणि पाणीटंचाईची समस्या कमी व्हावी यासाठी मनपा प्रशासनाने अशा कारवायांसोबतच पाणी अपव्यय रोखण्यावरही भर द्यावा, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
– महाराष्ट्र न्यूज टाईम्स
प्रतिनिधी : दिनेश गायके

