
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे मा. आयुक्त श्री. अमोल येडगे यांच्या निर्देशानुसार, मा. अतिरिक्त आयुक्त-२ श्रीमती कल्पिता पिंपळे यांच्या मार्गदर्शनाखाली व डॉ. उज्वला भामरे यांच्या समन्वयाने आरोग्य विभागामार्फत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PMJAY) अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना आयुष्मान भारत कार्ड ई-केवायसी करून कार्ड काढण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. या उपक्रमामुळे शहरातील अधिकाधिक नागरिकांना शासनाच्या आरोग्य संरक्षणाचा लाभ मिळणार आहे.
आयुष्मान भारत योजना ही देशातील सर्वसामान्य व गरजू नागरिकांसाठी वरदान ठरत असून, या योजनेअंतर्गत पात्र कुटुंबांना उपचारांसाठी आर्थिक संरक्षण उपलब्ध होते. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी कुटुंबांना प्रतिवर्ष ₹5 लाखांपर्यंतचे आरोग्य विमा संरक्षण उपलब्ध होत असून, विविध शासकीय व मान्यताप्राप्त रुग्णालयांमध्ये उपचारांची सुविधा मिळते. गंभीर आजारांच्या उपचारांमुळे होणारा आर्थिक भार कमी करण्यासाठी हे कार्ड अत्यंत उपयुक्त ठरत आहे.
पात्र लाभार्थी महानगरपालिकेच्या सर्व आरोग्य केंद्रांमध्ये भेट देऊन आयुष्मान भारत कार्ड ई-केवायसी व कार्ड निर्मितीची सुविधा सहजपणे प्राप्त करू शकतात. महानगरपालिकेच्या मान्यतेनुसार युग इन्फ्राटेक सर्व्हिसेस प्रा. लि., आशा सेविका, एम पी डब्लयु तसेच आरोग्य विभागातील कर्मचारी यांच्या संयुक्त प्रयत्नातून प्रत्येक पात्र लाभार्थ्यापर्यंत पोहोचून आयुष्मान कार्ड काढण्याची प्रक्रिया सुलभ करण्यात आली आहे. महानगरपालिका आरोग्य विभागामार्फत सर्व झोन, आरोग्य केंद्रे, दिव्यांग आयुष्मान कार्ड मोहिम, शासकीय व खाजगी कार्यालये अंतर्गत विविध मोहिम राबविण्यात आल्या आहेत. त्या अनुषंगाने आतापर्यंत एकूण 5,26,466 आयुष्मान कार्ड काढण्यात आले आहे.
नागरिकांनी या संधीचा लाभ घेत आपल्या कुटुंबाचे आरोग्य संरक्षण सुनिश्चित करावे, असे आवाहन मा.आयुक्त यांच्या मार्फत करण्यात येत आहे. आयुष्मान भारत कार्ड हे केवळ एक ओळखपत्र नसून, गरजेच्या वेळी कुटुंबाला आर्थिक आधार देणारे आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवांचा मार्ग खुला करणारे संरक्षण कवच आहे.
महानगरपालिका प्रशासनाचे उद्दिष्ट शहरातील प्रत्येक पात्र लाभार्थ्यापर्यंत आयुष्मान भारत योजनेचा लाभ पोहोचविण्याचे असून, यासाठी सर्व संबंधित यंत्रणा समन्वयाने कार्यरत आहेत.
घरोघरी आयुष्मान कार्ड – निरोगी कुटुंब, सुरक्षित भविष्य
आयुष्मान भारत कार्ड काढा, आरोग्य संरक्षणाची खात्री करा!

