छत्रपती संभाजीनगर(विमाका), दि. १2 : लम्पी चर्मरोगासारख्या संसर्गजन्य आजारांपासून राज्यातील गोधनाचे संरक्षणासाठी सर्वोच्च प्राधान्य आहे. पशुधन हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा तसेच शेतकरी बांधवांच्या उपजीविकेचा महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. पशुधनाचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी गोटपॉक्स लसीकरण हा सर्वात प्रभावी प्रतिबंधात्मक उपाय असून, सद्यस्थितीत ही मोहीम राज्यभर व्यापक स्वरूपात राबविण्यात येत आहे. पशुपालकांनीही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेऊन विभागाला सहकार्य करावे, असे आवाहन पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील केले आहे.
राज्यातील गायवर्ग पशुधनाला लम्पी चर्मरोगापासून सुरक्षित ठेवण्यासाठी पशुसंवर्धन विभागामार्फत गोटपॉक्स लसीकरण मोहिमेला गती देण्यात आली आहे. 2026-27 या वर्षासाठी आवश्यक असलेल्या गोटपॉक्स लसमात्रांचे उत्पादन पशुवैद्यकीय जैव पदार्थ निर्मिती संस्था, पुणे येथे सुरू असून, 21 व्या पशुगणनेनुसार राज्यातील गायवर्ग पशुधनाची संख्या विचारात घेऊन पहिल्या टप्प्यात एकूण उत्पादनाच्या 40 टक्के म्हणजेच 37 लाख 52 हजार लसमात्रांचे वाटप नियोजनबद्ध पद्धतीने सुरू करण्यात आले आहे. राज्यातील पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी ही लसीकरण मोहीम युद्धपातळीवर आणि तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.
लम्पी प्रतिबंधक लसीकरण मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पशुवैद्यकीय जैव पदार्थ निर्मिती संस्था(पुणे)यांनी आवश्यक लसमात्रांचे उत्पादन यशस्वीरीत्या पूर्ण केले आहे. लसींचे वितरण जिल्हास्तरावर सुरू असून लस क्षेत्रीय स्तरावर पोहोचविताना शीतसाखळी (कोल्ड चेन) कुठेही खंडित होणार नाही याची विशेष दक्षता घेण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या असून. गोटपॉक्स लसमात्रा प्राप्त होताच जिल्ह्यातील अधिक दूध देणाऱ्या व उच्च उत्पादनक्षम पशुधनाचे प्राधान्याने लसीकरण करणे तसेच लसीकरण मोहिमेचा विभागनिहाय एकत्रित दैनंदिन अहवाल दररोज संस्थेकडे सादर केला जाणार.
हॉटस्पॉट तालुक्यांवर विशेष लक्ष
गतवर्षी ज्या तालुक्यांमध्ये लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळून आला होता, त्या हॉटस्पॉट भागांमध्ये प्राधान्यक्रमाने लसीकरण मोहीम राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या व्यापक मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी जिल्ह्यातील सहकारी दुग्ध संघ, स्वयंसेवी संस्था, खाजगी पशुवैद्यक तसेच पशुसंवर्धन क्षेत्रातील विविध सेवादात्यांचे सहकार्य घेण्याचे आवाहन विभागाने केले आहे.
राज्यातील सर्व पशुपालकांनीही आपल्या पशुधनाचे वेळेत लसीकरण करून घेण्यासाठी स्थानिक शासकीय पशुवैद्यकीय दवाखाने व पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहनही विभागामार्फत करण्यात आले आहे.

