वैदिक संस्कृतीचे भव्य दर्शन; पाटीदार भवनात तीन दिवसीय ईष्टी यज्ञ सोहळा
सनातन परंपरेचा गौरवशाली सोहळा : ईष्टी यज्ञासाठी भाविकांना सहभागी होण्याचे आवाहन
छत्रपती संभाजीनगर,दि.11 जून 2026 (महाराष्ट्र न्यूज टाईम प्रतिनिधी)
अधिक मास समाप्तीच्या पावन निमित्ताने वैदिक संस्कृती, यज्ञ परंपरा आणि सनातन धर्माच्या गौरवशाली वारशाचे दर्शन घडविणारा भव्य त्रिदिनात्मक ईष्टी यज्ञ सोहळा परमपूज्य यज्ञमार्तंड बहुसोमयाजी दीक्षित प.पू. यज्ञेश्वर महाराज सेलुकर यांच्या पवित्र सान्निध्यात अग्निसोमसेवा प्रतिष्ठान, छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे.
श्रौत अग्निहोत्र यज्ञीय परंपरेचे जतन आणि संवर्धन करणारे सेलुकर घराणे मागील तीन पिढ्यांपासून अखंडपणे वैदिक यज्ञ परंपरेचे पालन करत आहे. या उज्ज्वल परंपरेचे संवाहक असलेल्या परमपूज्य यज्ञेश्वर महाराज सेलुकर यांनी देशभरात आतापर्यंत ३३ सोमयागांचे यशस्वी अनुष्ठान करून वैदिक संस्कृतीचा प्रचार-प्रसार केला आहे.
हा पवित्र सोहळा पाटीदार भवन, जालना रोड, छत्रपती संभाजीनगर येथे संपन्न होत असून, दिनांक १३ जून रोजी सायंकाळी ५.३० वाजता वैदिक अग्निस्थापना व त्यानंतर गुरु पंचपदी कार्यक्रमाने यज्ञ सोहळ्याची सुरुवात होणार आहे.
दिनांक १४ जून रोजी अग्निहोत्र परंपरेतील अत्यंत महत्त्वाचा विधी असलेला पिंड पितृ यज्ञ संपन्न होणार असून, त्यानंतर पुरुषोत्तम मासानिमित्त मुख्य वायनदान समारंभ पार पडणार आहे. याच दिवशी सकाळी ९ ते ११ या वेळेत सद्गुरुभक्त अविनाश थिगळे यांचे “रामायणातील यज्ञीय संदर्भ” या विषयावर विशेष विवेचन आयोजित करण्यात आले आहे.
विशेष आकर्षण म्हणून दिनांक १४ जून रोजी सायंकाळी ४.३० वाजता सकल हिंदू समाजासाठी सामूहिक श्रीसूक्त हवनाचे आयोजन करण्यात आले आहे. या पवित्र हवनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन अग्निसोमसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. विजय चाटोरीकर यांनी केले आहे.
दिनांक १५ जून रोजी सकाळी ७ ते १० या वेळेत मुख्य ईष्टी यज्ञ संपन्न होणार असून, त्यानंतर महाप्रसादाने या त्रिदिवसीय धार्मिक महोत्सवाची सांगता होईल.
वैदिक संस्कृतीचा अमूल्य वारसा अनुभवण्यासाठी आणि यज्ञाच्या दिव्य आध्यात्मिक ऊर्जेचा लाभ घेण्यासाठी भाविक, धर्मप्रेमी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन ईष्टी आयोजन समितीच्या वतीने केदार जोशी, महेश दिग्रसकर, शशिकांत ढवळे, डॉ. गजानन सुपेकर, डॉ. विजय चाटोरीकर, बाळकृष्ण बाभूळगावकर, संजय आवटी, विजयराव कुलकर्णी आणि अभय अग्निहोत्री यांनी केले आहे.
“यज्ञो वै श्रेष्ठतमं कर्म” या वैदिक संदेशाचा प्रसार करणारा हा आध्यात्मिक सोहळा छत्रपती संभाजीनगरच्या धार्मिक व सांस्कृतिक इतिहासातील एक महत्त्वपूर्ण पर्व ठरणार आहे. 
महाराष्ट्र न्यूज टाइम्स
संपादक-दिनेश गायके
संपर्क-९९२३२३७९७०

