मुंबई, दि. ८ : इतर मागास प्रवर्ग (ओबीसी), विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कल्याण येथे शासकीय मुलांचे वसतिगृह सुरू करण्यात आले आहे. या वसतिगृहामुळे व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना राहण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.
जिल्हानिहाय वसतिगृह सुरू करण्याच्या योजनेअंतर्गत हे वसतिगृह कृषी उत्पन्न बाजार समिती, इमारत क्र. ए-१०, पहिला मजला, कल्याण, जि. ठाणे येथे कार्यान्वित करण्यात आले आहे.
सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षापासून प्रथम वर्षात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश दिला जाणार आहे. तसेच पदविका अभ्यासक्रम पूर्ण करून पदवी अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे. जागा उपलब्ध असल्यास तृतीय आणि चतुर्थ वर्षातील पात्र विद्यार्थ्यांनाही प्रवेश दिला जाणार आहे.
आरक्षणाची तरतूद
वसतिगृहातील जागांचे आरक्षण पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे:
इतर मागास वर्ग (OBC) – ५१%
विमुक्त जाती व भटक्या जमाती – ३३%
विशेष मागास प्रवर्ग – ६%
दिव्यांग – ४%
अनाथ – २%
आर्थिक मागास प्रवर्ग – ४%
द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ वर्षातील प्रवेशासाठी बारावी परीक्षेतील अंतिम गुणांचा विचार करण्यात येणार आहे.
वसतिगृह प्रवेशासंबंधी अटी, शर्ती आणि अधिक माहितीसाठी नवीन प्रशासकीय इमारत, चौथा मजला, आर. सी. चेबूरकर मार्ग, चेंबूर, मुंबई येथे संपर्क साधावा, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण, मुंबई उपनगरच्या सहाय्यक संचालक मयुरी कदम यांनी केले आहे.

