छत्रपती संभाजीनगर, दि. ४ : दिल्लीतील भीषण हॉटेल अग्निकांडाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका प्रशासनाने शहरातील अग्निसुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. नागरिकांच्या जीवित सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत अग्निशमन परवाना नसलेल्या तसेच आवश्यक अग्निसुरक्षा यंत्रणा नसलेल्या आस्थापनांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत स्थायी समिती सभापती अनिल मकरिये यांनी दिले.
मनपा मुख्यालयात आयोजित बैठकीत मकरिये यांनी अग्निशमन विभागाला शहरातील सर्व हॉटेल्स, खाजगी रुग्णालये, कोचिंग क्लासेस, अभ्यासिका, जिम, खासगी शाळा, मॉल्स आणि इतर व्यावसायिक आस्थापनांची सखोल तपासणी करण्याचे निर्देश दिले. ज्या आस्थापनांकडे वैध अग्निशमन परवाना नाही किंवा आवश्यक अग्निसुरक्षा उपकरणांची कमतरता आहे, त्यांना तात्काळ नोटीस बजावून नियमानुसार कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले.
यावेळी सर्व संबंधित आस्थापनांचे फायर ऑडिट करण्यावर विशेष भर देण्यात आला. अग्निसुरक्षा नियमांचे काटेकोर पालन होत आहे की नाही याची खातरजमा करण्यासाठी विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे.
“नागरिकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या निष्काळजीपणाला माफी दिली जाणार नाही. शहरात दिल्लीसारखी दुर्घटना घडू नये यासाठी प्रशासन पूर्णपणे सतर्क असून आवश्यक उपाययोजना तातडीने राबविण्यात येतील,” असे अनिल मकरिये यांनी स्पष्ट केले.
बैठकीस आरोग्य सभापती डॉ. सुनीता सोळुंके, गृहनिर्माण व समाजकल्याण समिती सभापती जालिंदर शेंडगे, अतिरिक्त आयुक्त कल्पिता पिंपळे, उपआयुक्त तथा अग्निशमन विभाग प्रमुख लाखिचंद चव्हाण, अग्निशमन अधिकारी अशोक खांडेकर आणि प्रभारी आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. उज्वला भामरे उपस्थित होते.
मनपा प्रशासनाच्या या निर्णयामुळे शहरातील सार्वजनिक व व्यावसायिक आस्थापनांच्या अग्निसुरक्षा व्यवस्थेवर अधिक प्रभावी नियंत्रण येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

