प्रतिबंधित प्लॅस्टिकविरोधात मनपाची धडक कारवाई; २५ हजारांचा दंड; ६ लाखांहून अधिक किमतीचा साठा जप्त
छत्रपती संभाजीनगर : प्रतिबंधित प्लॅस्टिकविरोधातील मोहीम छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने अधिक तीव्र केली असून, पानदरीबा येथील राजेश्वरी प्लास्टिक या प्रतिष्ठानावर घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या पथकाने धडक कारवाई केली. या कारवाईत ३२५० किलोहून अधिक प्रतिबंधित प्लॅस्टिक जप्त करण्यात आले. जप्त प्लॅस्टिकची अंदाजे किंमत ६ लाख रुपयांहून अधिक असून, संबंधित प्रतिष्ठानावर २५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.
तपासणीदरम्यान मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक कॅरीबॅगचा साठा आढळून आला. १० लाखांहून अधिक प्लॅस्टिक कॅरीबॅग जप्त करून त्यांची नियमानुसार शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली. जप्त केलेले प्रतिबंधित प्लॅस्टिक पुढील प्रक्रियेसाठी पाठविण्यात आले आहे.
ही कारवाई महानगरपालिका आयुक्त अमोल येडगे यांच्या आदेशाने व घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त नंदकिशोर भोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्वच्छता अधिकारी अनिल जाधव, स्वच्छता निरीक्षक पंडित दाभाडे, नागरिक मित्र पथकाचे देविदास सुसर, बालाजी साबळे, सुवर्णसिंग परदेशी, जनार्दन सांगळे, संतोष बनकर, ज्ञानेश्वर पाटील, किशन निकम, जयेश मगरे तसेच स्वच्छता जवान दीपक पडुळ, सुभाष दाभाडे, बाबू जाधव आणि किशोर मगरे यांनी कारवाईत सहभाग घेतला.
आतापर्यंत ३७ टनांहून अधिक प्लॅस्टिक जप्त
महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून सुरू असलेल्या विविध कारवायांमध्ये आतापर्यंत ३७ टनांहून अधिक प्रतिबंधित प्लॅस्टिक जप्त करण्यात आले असून, त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली आहे. प्रतिबंधित प्लॅस्टिकचा वापर, साठवणूक, विक्री आणि वितरण करणाऱ्यांविरोधात यापुढेही कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे मनपाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
“दंडासोबत गुन्हाही दाखल करणार” – आयुक्त अमोल येडगे
महानगरपालिका आयुक्त अमोल येडगे यांनी सांगितले की, “शहराला प्रतिबंधित प्लॅस्टिकमुक्त करण्यासाठी धडक कारवाई सुरू आहे. यापुढे प्रतिबंधित प्लॅस्टिकचा साठा किंवा विक्री आढळून आल्यास केवळ दंडात्मक कारवाई न करता, नियमानुसार गुन्हाही दाखल करण्यात येणार आहे. प्रतिबंधित प्लॅस्टिकला कोणत्याही परिस्थितीत थारा दिला जाणार नाही.”
पर्यावरणपूरक पिशव्यांचा वापर करण्याचे महापौरांचे आवाहन
महापौर समीर राजूरकर यांनी नागरिकांना प्लॅस्टिक कॅरीबॅगचा वापर टाळण्याचे आवाहन केले. “नागरिकांनी दैनंदिन खरेदीसाठी प्लॅस्टिक कॅरीबॅगचा वापर पूर्णपणे टाळून कापडी, कागदी किंवा इतर पर्यावरणपूरक पिशव्यांचा वापर करावा. यामुळे पर्यावरणाचे रक्षण होण्यासोबतच शहर स्वच्छ ठेवण्यास मोठा हातभार लागेल. नागरिकांनी महानगरपालिकेच्या प्रतिबंधित प्लॅस्टिकविरोधी मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा,” असे त्यांनी सांगितले.

