उत्कृष्ट गणेश मंडळांना तालुका व जिल्हास्तरावर पुरस्कार
छत्रपती संभाजीनगर, दि. १ : यंदाचा गणेशोत्सव ‘डीजे’मुक्त, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक करण्यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस, स्थानिक स्वराज्य संस्था, सार्वजनिक गणेश मंडळे आणि नागरिकांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सर्व शासकीय विभागांची समन्वय बैठक झाली. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी. एम., जिल्हा पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव, अपर जिल्हाधिकारी संभाजी अडकुणे, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्धन विधाते यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
डीजेऐवजी पारंपरिक वाद्यांना प्राधान्य
गणेशोत्सव काळात ध्वनीप्रदूषण रोखण्यासाठी तसेच उत्सवाचे पावित्र्य आणि सामाजिक सलोखा कायम ठेवण्यासाठी सार्वजनिक गणेश मंडळांनी ‘डीजे’चा वापर टाळून पारंपरिक वाद्यांना प्राधान्य द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी गौडा यांनी केले. प्रशासनाने मंडळांशी नियमित संवाद साधून आवश्यक सूचना व मार्गदर्शन करावे, असेही त्यांनी सांगितले.
उत्कृष्ट मंडळांना रोख पारितोषिक
राज्य शासनाच्या उत्कृष्ट सार्वजनिक गणेश मंडळ स्पर्धेत अधिकाधिक मंडळांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. सामाजिक उपक्रम, पर्यावरणपूरकता, स्वच्छता आणि सुरक्षिततेला प्रोत्साहन देण्यासाठी तालुका व जिल्हास्तरावर पुरस्कार देण्यात येणार आहेत.
तालुकास्तरावरील प्रथम क्रमांकाच्या मंडळाला २५ हजार रुपये, तर जिल्हास्तरावर प्रथम ५० हजार, द्वितीय ४० हजार आणि तृतीय क्रमांकाला ३० हजार रुपये पारितोषिक देण्यात येणार आहे.
सुरक्षा, वाहतूक आणि विसर्जनाचे काटेकोर नियोजन
गणेश मंडळांनी मंडप उभारणीपासून विसर्जनापर्यंत अग्निसुरक्षा, सुरक्षित विद्युत व्यवस्था, आपत्कालीन व्यवस्थापन, स्वच्छता व आरोग्य सुविधा यांची काळजी घ्यावी. गर्दीच्या ठिकाणी वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी पार्किंग, मिरवणूक मार्ग आणि पर्यायी वाहतूक मार्गांचे आगाऊ नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
विसर्जनस्थळी पुरेशी प्रकाश व्यवस्था, वैद्यकीय पथके व रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यासोबतच विसर्जनानंतर तातडीने स्वच्छता मोहीम राबवावी. पर्यावरणपूरक गणेशमूर्ती आणि नैसर्गिक साहित्याच्या वापराला प्रोत्साहन द्यावे, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
प्रसादाची गुणवत्ता तपासणार
गणेश मंडळांकडून वाटप होणारा प्रसाद तसेच बाजारातील मिठाईची अन्न व औषध प्रशासनाने विशेष तपासणी करावी. प्रसाद वाटपासाठी आवश्यक परवानगी घेण्याबाबत मंडळांना सहकार्य करावे आणि भेसळयुक्त पदार्थांचा वापर होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश देण्यात आले.
कायगाव टोका परिसरात विशेष सुरक्षा
जिल्हा पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांनी विसर्जनाच्या दृष्टीने संवेदनशील ठिकाणांच्या सुरक्षेबाबत सूचना दिल्या. गंगापूर तालुक्यातील कायगाव टोका परिसरातील विसर्जनस्थळी मोठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन पुरेशी प्रकाश व्यवस्था व सुरक्षा उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच समाजकंटकांवरील प्रतिबंधात्मक कारवाईची प्रकरणे तातडीने निकाली काढण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
गणेशोत्सव शांततेत, सुरक्षिततेत आणि पर्यावरणपूरक पद्धतीने पार पडण्यासाठी प्रशासन सज्ज असून, नागरिक आणि गणेश मंडळांनी सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
गणेशोत्सव ‘डीजे’मुक्त, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक करण्याचे आवाहन सर्व घटकांनी समन्वयाने काम करावे : जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.
Related Posts
Add A Comment

