रेशीम धाग्यातून जवानांना बहिणीच्या प्रेमाची अनुभूती
कन्नड : (वसीम शेख प्रतिनिधी) रक्षाबंधनाच्या पवित्र सणाचे औचित्य साधत देशाच्या सीमेवर अहोरात्र पहारा देणाऱ्या भारतीय जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कर्मवीर काकासाहेब देशमुख माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थिनींनी स्वतःच्या हाताने आकर्षक राख्या तयार करून त्या सीमेवरील जवानांना पाठविल्या. या उपक्रमातून विद्यार्थिनींनी देशभक्ती, सामाजिक बांधिलकी आणि सैनिकांविषयीचा आदर व्यक्त केला.
रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा आणि अतूट नात्याचा सण आहे. मात्र, देशाच्या रक्षणासाठी आपल्या कुटुंबापासून दूर राहणाऱ्या जवानांना या दिवशी बहिणीच्या प्रेमापासून दूर राहावे लागते. हीच भावना लक्षात घेऊन विद्यालयातील विद्यार्थिनींनी ‘सीमेवरचा जवान हा आमचा भाऊ’ या भावनेतून राख्या तयार केल्या.
विविध रंग, आकर्षक सजावट आणि देशभक्तीचा संदेश असलेल्या या राख्यांमधून विद्यार्थिनींनी जवानांच्या शौर्याला, त्यागाला आणि देशसेवेला मनःपूर्वक सलाम केला. ऊन, वारा, पाऊस आणि कडाक्याच्या थंडीची पर्वा न करता देशाच्या सीमेचे रक्षण करणाऱ्या सैनिकांमुळेच आपण आपल्या कुटुंबासोबत सण-उत्सव आनंदाने साजरे करू शकतो, याची जाणीव या उपक्रमातून करून देण्यात आली.
‘राखीचा धागा छोटासा, पण त्यामागची भावना आभाळाएवढी!’ या भावनेतून तयार केलेल्या राख्या जवानांपर्यंत पोहोचवून विद्यार्थिनींनी त्यांच्याशी एक अनोखे भावनिक नाते जोडण्याचा प्रयत्न केला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, सैनिकांविषयी आदर, कृतज्ञता आणि सामाजिक संवेदनशीलता रुजण्यास मदत झाली.
विद्यालयातील ६७८ विद्यार्थिनी व विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला. त्यामध्ये साक्षी चोपडे, काश्मिरा शेख, चंद्रकांत कुराडे, गौरी कुराडे, आराध्या पवार, बुशरा शहा, तन्वी जाधव, भक्ती भिंगारे, सृष्टी जाधव, जानवी मोहिते, हर्ष दरेकर, आयुष गोंडे, तन्वी धनेधर आणि स्वरा मोहिते यांनी उत्कृष्ट राख्या तयार केल्या. उत्कृष्ट राख्या तयार करणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
या उपक्रमासाठी जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव सागर जाधव, मुख्याध्यापक रवींद्र पाटील, पर्यवेक्षक गणेश डव्हारे आणि सांस्कृतिक विभागप्रमुख प्रदीप सनंसे यांनी मार्गदर्शन केले.
राखी स्पर्धेचे परीक्षक म्हणून भाग्यश्री खैरनार, करण राठोड, सौरभ हिरे, देविदास चौधरी, भागवत पल्हाड, द्वारका ढगे आणि संगीता आहिरे यांनी काम पाहिले. विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उपक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
सीमेवरील जवानांसाठी पाठवलेली ही राखी केवळ रेशीम धागा नसून, देशाच्या रक्षणासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या सैनिकांप्रती व्यक्त केलेले प्रेम, कृतज्ञता आणि अभिमानाचे प्रतीक ठरली आहे. विद्यार्थिनींच्या या स्तुत्य राष्ट्रभक्तीपर उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
– महाराष्ट्र न्यूज टाइम्स

