छत्रपती संभाजीनगर, : शहरातील पाण्याची परिस्थिती लक्षात घेता उपलब्ध पाण्याचा काटकसरीने आणि जबाबदारीने वापर करण्याचे आवाहन छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. पिण्याच्या पाण्याचा अपव्यय करणाऱ्या नागरिकांविरुद्ध आता कडक दंडात्मक कारवाई करण्यात येणार असून, त्याची सुरुवात आज पैठण गेट परिसरातून करण्यात आली.
आज सकाळी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आयुक्त अमोल येडगे आणि उपआयुक्त तथा घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख नंदकिशोर भोंबे यांच्या निदर्शनास पैठण गेट परिसरात एका नागरिकाकडून मोठ्या प्रमाणात नळाचे पाणी वाया घालविले जात असल्याचे आले. संबंधित नागरिक निलेश देशमुख यांनी घरातील पाण्याची टाकी भरल्यानंतरही नळाचे पाणी बंद न करता ते रस्त्यावर सोडले होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असल्याचे निदर्शनास आले.
या प्रकाराची गंभीर दखल घेत आयुक्त अमोल येडगे यांनी संबंधित नागरिकावर १० हजार रुपयांचा दंड आकारण्याचे निर्देश दिले. पाण्यासारख्या अत्यंत मौल्यवान नैसर्गिक संसाधनाचा अशा पद्धतीने अपव्यय करणे योग्य नसून, नागरिकांनी पाणी वापरताना अधिक जबाबदारीने वागणे आवश्यक असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.
*पाणी वाया घालविण्याचे प्रकार टाळण्याचे आवाहन*
महापालिकेच्या पाणीपुरवठ्याचे पाणी घरगुती वापरासाठी आवश्यकतेपेक्षा अधिक घेणे, पाण्याच्या टाक्या भरल्यानंतर नळ सुरू ठेवणे, टाकीतून ओव्हरफ्लो होणारे पाणी रस्त्यावर वाहू देणे, घरासमोरील रस्ते किंवा परिसर धुण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर करणे, वाहन धुताना मोठ्या प्रमाणात पाणी वापरणे, नळ किंवा पाइपलाइनमधून होणारी गळती वेळेत दुरुस्त न करणे तसेच सार्वजनिक ठिकाणी नळ सुरू ठेवणे, अशा प्रकारे पाण्याचा अपव्यय करणे टाळावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
विशेषतः पाण्याच्या टाक्या भरल्यानंतरही पाणी रस्त्यावर वाहत राहणे हा पाण्याचा गंभीर अपव्यय असून, अशा प्रकारांकडे नागरिकांनीही गांभीर्याने पाहावे. आपल्या घरातील नळ, टाक्या आणि पाणीपुरवठ्याच्या जोडण्यांमध्ये गळती असल्यास ती तातडीने दुरुस्त करावी, असेही महापालिकेने स्पष्ट केले आहे.
अपव्यय आढळल्यास कडक कारवाई
“शहरात कोणत्याही नागरिकाकडून पाणी रस्त्यावर सोडणे अथवा कोणत्याही स्वरूपात पाण्याचा अपव्यय होत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांविरुद्ध कडक दंडात्मक कारवाई करण्यात येईल,” असा स्पष्ट इशारा आयुक्त अमोल येडगे यांनी दिला आहे.
नागरिकांनी पाण्याचा प्रत्येक थेंब जपून वापरावा, अनावश्यक पाणी वापर टाळावा आणि महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त अमोल येडगे यांनी केले आहे.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
पाणी वाया घालविणाऱ्या नागरिकांवर कडक दंडात्मक कारवाई
Related Posts
Add A Comment

