४ लाख ९१ हजार रुपयांचा गोवंशासह ४ लाख ९१ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त
वैजापूर : कत्तलीच्या उद्देशाने गोवंश जनावरांना क्रूरतेने वागणूक देत चारापाण्यापासून वंचित ठेवून पत्र्याच्या शेडमध्ये डांबून ठेवल्याची माहिती मिळताच वैजापूर पोलिसांनी छापा टाकून १६ गोवंश जनावरांची सुटका केली. या कारवाईत एकूण ४ लाख ९१ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्ह्यात गोवंशाची बेकायदेशीर वाहतूक, अवैध कत्तल, गोमांस तस्करी तसेच प्राण्यांवरील क्रूरतेविरुद्ध विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. याच मोहिमेअंतर्गत ११ ऑगस्ट रोजी सायंकाळी सुमारे ५.५६ वाजता वैजापूर पोलिसांना मिल्लत नगर परिसरात गोवंश जनावरे कत्तलीच्या उद्देशाने डांबून ठेवल्याची गोपनीय माहिती मिळाली.
माहितीच्या आधारे पोलिसांनी पंचांसह संबंधित ठिकाणी छापा टाकला. यावेळी एका पत्र्याच्या शेडमध्ये १६ गोवंश जनावरे अत्यंत कमी जागेत आखूड दोऱ्यांनी बांधून ठेवलेली आढळली. जनावरांसाठी चारा-पाण्याची कोणतीही व्यवस्था करण्यात आली नव्हती. तसेच शेडजवळ कत्तलीसाठी वापरण्यात येणारी दोन धारदार हत्यारे (सत्तूर) आढळून आली.
पोलिसांनी सर्व १६ गोवंश जनावरांची सुटका करून त्यांना हडसपिंपळगाव, ता. वैजापूर येथील श्री रेणुका गोशाळेत सुरक्षितपणे हलविले. जप्त केलेल्या १६ गोवंश जनावरांची अंदाजे किंमत ४ लाख ९१ हजार रुपये असून, दोन सत्तूरची किंमत ६०० रुपये आहे. असा एकूण ४ लाख ९१ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ५२१/२०२६ अन्वये प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम, १९६० मधील कलम ११(१)(इ) व ११(१)(ह) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामागील संपूर्ण साखळीचा तपास वैजापूर पोलीस करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत फुंदे यांच्या मार्गदर्शनाखाली परिवीक्षाधीन पोलीस उपअधीक्षक तथा वैजापूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी विनय सोनावणे व त्यांच्या पथकाने केली.

