६,१६७ हेक्टर क्षेत्रावर जलसंधारण; ११ हजारांहून अधिक ग्रामस्थांना होणार थेट लाभ
छत्रपती संभाजीनगर, दि. २७ : जिल्ह्यातील पैठण आणि छत्रपती संभाजीनगर तालुक्यांतील ९ गावांमध्ये ‘वसुंधरा’ या सर्वसमावेशक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. टोयोटा-किर्लोस्कर मोटर्सच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीसह राज्य शासन आणि लोकसहभागातून हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविला जाणार आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात सामंजस्य करार करण्यात आला.
ऑगस्ट २०२६ ते जुलै २०२९ या तीन वर्षांच्या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या या प्रकल्पासाठी एकूण १६ कोटी ५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध होणार आहे. यामध्ये टोयोटा-किर्लोस्कर मोटर्सचा ९ कोटी ३३ लाख रुपये, महाराष्ट्र शासनाचा ५ कोटी ४० लाख रुपये, तर स्थानिक समुदायाचा १ कोटी ३३ लाख रुपयांचा सहभाग राहणार आहे.
गोदावरी नदीच्या पाणलोट क्षेत्रातील या ९ गावांमध्ये दरवर्षी एप्रिल ते जूनदरम्यान पाणीटंचाईची तीव्र समस्या निर्माण होते. त्यामुळे पाणलोट विकास आणि जलसंधारणाच्या माध्यमातून पाणी उपलब्धता वाढवून शेतीला बळकटी देण्याचा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे.
या प्रकल्पांतर्गत ६,१६७ हेक्टर क्षेत्रावर विविध जलसंधारण व पाणलोट विकासाची कामे केली जाणार असून, सुमारे २० टक्के क्षेत्र सिंचनाच्या कक्षेत आणण्याचे नियोजन आहे. या उपक्रमाचा २,३९८ कुटुंबांतील सुमारे ११,२६८ ग्रामस्थांना थेट लाभ मिळणार आहे.
पाण्याची उपलब्धता वाढविण्यासोबतच जमिनीतील ओलावा टिकवून कृषी उत्पादन वाढविणे, हवामान बदलाला अनुकूल शेती पद्धती विकसित करणे, अल्पभूधारक शेतकरी, शेतमजूर व भूमिहीन कुटुंबांसाठी रोजगार व उपजीविकेच्या संधी निर्माण करणे, तसेच ग्रामस्थांच्या सहभागातून नैसर्गिक संसाधनांचे व्यवस्थापन करणे, ही या प्रकल्पाची प्रमुख उद्दिष्टे आहेत.
प्रकल्पामुळे संबंधित गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची उपलब्धता ९ महिन्यांवरून वर्षभर करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. हा प्रकल्प वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट (WOTR) यांच्या माध्यमातून राबविला जाणार असून, टोयोटा-किर्लोस्कर मोटर्सकडून आर्थिक व तांत्रिक सहकार्य मिळणार आहे. राज्य शासनाच्या विविध योजनांचा समन्वय साधून प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी केली जाणार आहे.
या सामंजस्य करारावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी.एम., उपवनसंरक्षक सुरेखा माने यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी आणि WOTRचे प्रतिनिधी उपस्थित होते.
पाणलोट विकास, जलसंधारण आणि लोकसहभागाच्या माध्यमातून टंचाईग्रस्त ९ गावांना पाणीसमृद्ध आणि शेतीच्या दृष्टीने अधिक सक्षम बनविण्यास या प्रकल्पाची मोठी मदत होणार आहे.

