वेरूळमध्ये जागतिक दर्जाची स्वच्छता राखण्यासाठी सामूहिक प्रतिज्ञा
छत्रपती संभाजीनगर, विमाका,दि. 27 : वेरूळ-घृष्णेश्वर येथे जगभरातून मोठ्या संख्येने पर्यटक आणि भाविक भेट देत असतात. पुढील वर्षी होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरही या परिसरात मोठ्या संख्येने भाविक व पर्यटक येण्याची शक्यता आहे. त्यांना आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच परिसरात निर्माण होणाऱ्या घनकचऱ्याचे संबंधित सर्व यंत्रणांनी समन्वयाने योग्य व्यवस्थापन करावे, असे निर्देश विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी दिले.
स्वच्छता राखणे ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी असून, वेरूळ येथे यापुढे जागतिक दर्जाची स्वच्छता राखण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करावेत, असे आवाहन करत विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी उपस्थितांना स्वच्छतेची सामूहिक प्रतिज्ञा दिली.
वेरूळ-घृष्णेश्वर मंदिर परिसरातील विकास आराखडा व स्वच्छतेबाबत विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी. एम., अपर आयुक्त (विकास) सुषमा देसाई यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, पुरातत्त्व विभाग, घृष्णेश्वर मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी, छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, ग्रामपंचायत तसेच पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी विविध सूचना व मते मांडली.
जी. श्रीकांत म्हणाले की, वेरूळ-घृष्णेश्वर मंदिर परिसरात पर्यटक व भाविकांची कायम वर्दळ असते. त्यामुळे येथे निर्माण होणाऱ्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्याबरोबरच घनकचरा व्यवस्थापन नियम, 2026 ची प्रभावी अंमलबजावणी करावी. घनकचरा व्यवस्थापनाच्या अनुषंगाने या परिसरात घनकचरा प्रक्रिया केंद्र उभारण्यासाठी तातडीने सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करावा, असे निर्देशही त्यांनी संबंधित यंत्रणांना दिले.
पर्यटक, भाविक व व्यावसायिकांकडून तसेच गर्दीच्या काळात मोठ्या प्रमाणावर निर्माण होणारा कचरा वेळोवेळी गोळा करण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळाचा वापर करावा. त्याचबरोबर परिसर सुशोभीकरण, जनजागृती आणि दंडात्मक उपाययोजना राबवाव्यात, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
कचऱ्याचे ओला व सुका असे वर्गीकरण होणे आवश्यक असून, कचऱ्यापासून पुनर्वापराच्या वस्तूंच्या निर्मितीला प्रोत्साहन द्यावे. यासाठी महिला बचत गटांचा सहभाग वाढवावा, असेही विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी सांगितले.

