छत्रपती संभाजीनगर, दि. २१ : भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात सुरू असलेल्या मतदार यादीच्या कामाचा विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी आढावा घेतला. मतदार यादी अचूक, अद्ययावत आणि त्रुटीमुक्त करण्यासाठी प्रत्येक टप्प्यातील काम निश्चित वेळेत पूर्ण करावे, तसेच मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्या (बीएलओ) कामावर नियमित लक्ष ठेवावे, अशा सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत जिल्ह्यातील एसआयआर कार्यक्रमाच्या प्रगतीचा विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा, अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी रणजीत पाटील, सहआयुक्त मंजुषा मिसकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सविता चौधर, तहसीलदार के. के. भदाने यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
एसआयआरच्या कामांतर्गत बीएलओंकडून घरोघरी जाऊन मतदारांच्या माहितीची पडताळणी केली जात आहे. गणना अर्ज अचूकपणे भरून घेणे, आवश्यक कागदपत्रांची तपासणी करणे आणि प्राप्त अर्जांची वेळेत छाननी करण्यावर विशेष भर देण्याच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या. कोणताही पात्र मतदार मतदार यादीतून वंचित राहू नये, तसेच अपात्र नोंदी नियमानुसार वेळेत वगळण्यात याव्यात, याची दक्षता घेण्याचे निर्देशही देण्यात आले.
मतदार यादी अधिक विश्वासार्ह, पारदर्शक आणि सर्वसमावेशक करण्यासाठी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम महत्त्वाचा आहे. त्यामुळे प्रत्येक अधिकाऱ्याने जबाबदारीने काम करून निर्धारित वेळापत्रकानुसार उद्दिष्टे पूर्ण करावीत. प्रलंबित कामांचा तातडीने निपटारा करून निवडणूक शाखा, तहसील प्रशासन आणि बीएलओ यांनी परस्पर समन्वयाने काम करावे, असे श्रीकांत यांनी सांगितले.
दरम्यान, मतदार यादी अचूक करण्यासाठी नागरिकांनीही बीएलओंना आवश्यक कागदपत्रे आणि माहिती उपलब्ध करून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.
जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी सादरीकरणाद्वारे जिल्ह्यातील एसआयआर कार्यक्रमाच्या प्रगतीची माहिती बैठकीत दिली.

