विशेष लेख.
दिनांक : 24 जून, 2026
पावसाळ्यात डासजन्य आजारांपासून बचावासाठी
करा प्रतिबंधात्मक उपाययोजना
पावसाळा सुरू होत आहे. बदलत्या वातावरणामुळे विविध संसर्गजन्य आजारांचा धोका वाढतो. विशेषतः डासांमुळे पसरणाऱ्या आजारांपासून बचाव करण्यासाठी वेळेत प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्यास आपण स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवू शकतो. एडीस डासांद्वारे पसरणाऱ्या डेंग्यू, चिकनगुनिया आणि झिका या आजारांच्या प्रतिबंधासाठी शासन व आरोग्य विभागामार्फत विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत.
साथरोगपूर्व तयारी
डेंग्यूसारख्या आजारांवर प्रभावी नियंत्रण मिळविण्यासाठी संशयित रुग्णांचे वेळेत निदान व नोंदणी केली जाते. तपासणीसाठी आवश्यक किट्स पुरेशा प्रमाणात उपलब्ध ठेवण्यात येतात. रुग्णांची माहिती IHIP-VBD पोर्टलवर दररोज अद्ययावत केली जाते. रुग्णसंख्येत वाढ झाल्यास अतिरिक्त खाटा, औषधे, वैद्यकीय उपकरणे आणि रुग्णवाहिकांची उपलब्धता सुनिश्चित केली जाते.
साथरोग आटोक्यात ठेवण्यासाठी फॉगिंग यंत्रे, स्प्रे पंप आणि इतर कीटकनाशक फवारणीसाठीची उपकरणे कार्यरत स्थितीत ठेवली जातात. तसेच राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार डेंग्यू रुग्ण व्यवस्थापनाबाबत आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना नियमित प्रशिक्षण दिले जाते.
नागरिकांनी घ्यावयाची काळजी
“आठवड्यातून एक दिवस – कोरडा दिवस; डासमुक्त परिसर, निरोगी परिवार.”
“डासांची उत्पत्ती रोखा, डेंग्यू-चिकनगुनिया-झिका दूर ठेवा.”
डेंग्यू, चिकनगुनिया आणि झिका हे आजार एडीस डासांच्या चाव्यामुळे पसरतात. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने पुढील प्रतिबंधात्मक उपायांचे पालन करणे आवश्यक आहे :
* घराभोवती व परिसरात साचलेले पाणी नियमितपणे काढून टाकावे.
* पाण्याच्या टाक्या, ड्रम, बादल्या आणि इतर पाणीसाठवणाऱ्या भांड्यांवर झाकण ठेवावे.
* कुलर, फुलदाण्या, टायर व इतर पाणी साचू शकणाऱ्या वस्तू नियमित स्वच्छ कराव्यात.
* डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी आवश्यकतेनुसार लार्वानाशक औषधांचा वापर करावा.
* धूर फवारणी (फॉगिंग) आणि कीटकनाशक फवारणीस सहकार्य करावे.
* डास नियंत्रणाबाबत जनजागृती करून परिसर स्वच्छ ठेवावा.
* पूर्ण बाह्यांचे कपडे परिधान करावेत तसेच डासप्रतिबंधक क्रीम, जाळी किंवा मच्छरदाणीचा वापर करावा.
* ताप, अंगदुखी, सांधेदुखी, डोकेदुखी किंवा पुरळ यांसारखी लक्षणे आढळल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा.
या सर्व उपाययोजनांमुळे एडीस डासांची उत्पत्ती रोखण्यास मदत होते आणि डेंग्यू, चिकनगुनिया व झिका यांसारख्या आजारांचा प्रसार प्रभावीपणे कमी करता येतो.

