मुंबई, दि. २२ :(प्रतिनिधी)महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ६४ व्या महाराष्ट्र राज्य नाट्य महोत्सवाच्या विभागीय पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन ३० जून २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिरात करण्यात आले आहे.
या सोहळ्यात ६४ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा, २२ वी महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धा आणि प्रथम मराठी एकांकिका स्पर्धेच्या प्राथमिक फेरीतील पारितोषिक विजेत्या कलाकार, बालकलाकार व नाट्यसंस्थांचा सन्मान करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्य नाट्य महोत्सव हा राज्याच्या समृद्ध रंगभूमी परंपरेचा गौरव करणारा महत्त्वपूर्ण सांस्कृतिक उपक्रम मानला जातो. या महोत्सवामुळे राज्यभरातील नाट्यसंस्था, लेखक, दिग्दर्शक, कलाकार आणि तंत्रज्ञ यांना आपली कला सादर करण्यासाठी प्रभावी व्यासपीठ उपलब्ध होत आहे. तसेच मराठी नाट्य परंपरेच्या जतन व संवर्धनालाही चालना मिळत आहे.
या पारितोषिक वितरण सोहळ्यात अभिनय, दिग्दर्शन, लेखन, नेपथ्य, प्रकाशयोजना, संगीत आणि विविध तांत्रिक क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कलाकारांचा गौरव करण्यात येणार आहे. यामुळे नवोदित कलाकारांना प्रेरणा मिळून नाट्य क्षेत्रात उत्कृष्टतेचे नवे मानदंड निर्माण होण्यास मदत होणार आहे.
हा कार्यक्रम सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला आहे.
राज्यातील नाट्यसंस्कृती अधिक समृद्ध करण्यासाठी आणि नव्या पिढीपर्यंत सांस्कृतिक वारसा पोहोचविण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभाग विविध उपक्रम सातत्याने राबवत आहे. या गौरव सोहळ्यास प्रवेश विनामूल्य असून नाट्यप्रेमी, कलाकार, रंगकर्मी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्रीराम पांडे यांनी केले आहे.
महाराष्ट्र न्यूज टाइम्स
संपादक – दिनेश गायके

