
छत्रपती संभाजीनगर, दि. २२ : जागतिक योग दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर विमानतळ प्राधिकरणाच्या वतीने विशेष योग शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन ग्रँड मास्टर अनिल बी. महाजन यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले.
यावेळी ग्रँड मास्टर महाजन यांनी उपस्थितांना विविध योगासने, प्राणायाम व ध्यान प्रक्रियेची प्रात्यक्षिके करून दाखवली. योगामुळे शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ राहते, तणाव कमी होतो आणि जीवनशैली अधिक निरोगी बनते, असे प्रतिपादन त्यांनी केले. तसेच “योग करा, निरोगी रहा” हा संदेश देत नियमित योगाभ्यास करण्याचे आवाहन त्यांनी सर्व योगप्रेमींना केले.
कार्यक्रमास विमानतळ प्राधिकरणाचे अधिकारी, सुरक्षा कर्मचारी, कार्यालयीन कर्मचारी तसेच योगप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिबिरात सहभागी झालेल्यांनी योगासने व प्राणायामाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. कार्यक्रमामुळे आरोग्याविषयी जनजागृती होऊन योगाबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याचे उपस्थितांनी सांगितले.
जागतिक योग दिनानिमित्त आयोजित या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, निरोगी जीवनशैलीचा संदेश प्रभावीपणे पोहोचविण्यात आला.

महाराष्ट्र न्यूज टाइम्स
संपादक – दिनेश गायके

