छत्रपती संभाजीनगर/वैजापूर | प्रतिनिधी
अन्न व औषध प्रशासन (FDA), छत्रपती संभाजीनगर यांनी अन्न सुरक्षा मोहिमेअंतर्गत वैजापूर तालुक्यातील गंगापूर रोड परिसरात मोठी कारवाई करत संशयित भेसळयुक्त व चुकीच्या लेबलिंगच्या संशयाखाली खाद्यतेलाचा मोठा साठा जप्त केला आहे.
FDA पथकाने गंगापूर रोड येथील एम/एस अरुल ट्रेड वर्ल्ड या आस्थापनेवर छापा टाकला. तपासणीदरम्यान ‘श्री गोल्ड’ ब्रँडचे रिफाइंड सोयाबीन तेल संशयास्पद स्वरूपात साठवून ठेवण्यात आल्याचे आढळून आले. प्राथमिक तपासात सदर माल भेसळयुक्त तसेच चुकीच्या लेबलिंगचा (Misbranded) असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला.
कारवाईदरम्यान एकूण ४७९.४ किलो रिफाइंड सोयाबीन तेल जप्त करण्यात आले. जप्त मालाची अंदाजित किंमत ₹१,१३,३९७ इतकी आहे.
या प्रकरणात अतुल परसमल बोथरा (वय ३६ वर्षे), प्रोप्रायटर, यांचे नाव समोर आले आहे.
ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती पी. पी. सुरसे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त डी. व्ही. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सहआयुक्त एस. आर. करकाळे यांच्या निर्देशानुसार ही मोहीम राबविण्यात आली.
जप्त केलेल्या खाद्यतेलाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले असून अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधितांवर अन्न सुरक्षा कायद्यानुसार पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे FDA प्रशासनाने स्पष्ट केले.

