महाराष्ट्र न्यूज टाईम्स विशेष
खतासाठी रांगा संपणार; QR कोडद्वारे मिळणार अनुदानित खत
दर्जेदार कृषी निविष्ठा वेळेत मिळण्यासाठी भरारी पथके सज्ज, गैरप्रकार करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा
छत्रपती संभाजीनगर, दि. २ : राज्यातील शेतकऱ्यांसाठी खत वितरण व्यवस्थेत मोठा बदल घडवून आणणारा महत्त्वाकांक्षी पथदर्शी प्रकल्प ५ जूनपासून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सुरू होत आहे. केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या “नॅशनल फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल” या उपक्रमांतर्गत आता शेतकऱ्यांना मोबाईल ॲपच्या माध्यमातून खताची नोंदणी, बुकिंग आणि खरेदी करता येणार आहे.
राज्यातील केवळ छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यांची या पथदर्शी प्रकल्पासाठी निवड करण्यात आली असून, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी गावागावांपर्यंत या नव्या प्रणालीची माहिती पोहोचविण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दीपक गवळी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा
सध्या अनेकदा खत उपलब्ध आहे की नाही, याची माहिती नसल्याने शेतकऱ्यांना विविध दुकानांमध्ये फेऱ्या माराव्या लागतात. काही ठिकाणी तासन्तास रांगेत उभे राहावे लागते. नव्या प्रणालीमुळे हा त्रास मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.
शेतकरी मोबाईल ॲपवरून आपल्या पसंतीच्या कृषी सेवा केंद्रात खत बुक करू शकतील. बुकिंगनंतर तयार होणाऱ्या QR कोडच्या आधारे तीन दिवसांच्या आत खताची उचल करता येईल.
प्रकल्पाची प्रमुख वैशिष्ट्ये
✔️ ऍग्रीस्टॅक (Farmer ID) आणि IFMS प्रणालीचे एकत्रीकरण
✔️ मोबाईल ॲपवरून थेट खत बुकिंग
✔️ रांगेत उभे राहण्याची गरज नाही
✔️ QR कोडद्वारे खत वितरण
✔️ प्रत्येक खताच्या गोणीची डिजिटल नोंद
✔️ खतांचे समन्यायी वाटप
✔️ अनुदानित खतांच्या गैरवापराला आळा
✔️ उपलब्ध साठ्याची ऑनलाइन माहिती
असे करा खत बुकिंग
शेतकऱ्यांना प्लेस्टोअरवर उपलब्ध असलेले Framework For Fertilizer Sale हे ॲप डाउनलोड करावे लागेल.
यानंतर:
● आधार क्रमांक व OTP द्वारे लॉगिन
● जमिनीची माहिती नोंदणी
● पीक व हंगाम निवड
● शिफारस केलेले खत निवड
● आवश्यक बॅगांची संख्या निश्चित
● जवळील विक्रेता निवड
● QR कोड प्राप्त
● विक्रेत्याकडे QR कोड दाखवून खताची उचल
आधार प्रमाणीकरण बंधनकारक
या प्रक्रियेत आधार प्रमाणीकरण आवश्यक असून जमिनीची माहिती अद्ययावत असणे गरजेचे आहे. चुकीची माहिती भरल्यास अर्ज प्रलंबित राहू शकतो. शेतकऱ्यांनी QR कोड सुरक्षित जतन करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
दर्जेदार कृषी निविष्ठांसाठी विभागीय भरारी पथके सक्रिय
खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये बियाणे, खते आणि कीडनाशके वेळेत व योग्य दरात उपलब्ध व्हावीत यासाठी कृषी विभागाने विशेष मोहीम सुरू केली आहे.
छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यांसाठी विभागीय भरारी पथकांची स्थापना करण्यात आली असून ए. एल. काळुशे यांच्याकडे पथक प्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.
या पथकात पी. ए. ताजने, एच. एस. कातोरे आणि एस. जी. बंडगर यांचाही समावेश करण्यात आला आहे.
साठेबाजी व काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई
कृषी विभागाने स्पष्ट इशारा दिला आहे की,
खत, बियाणे किंवा औषधांची साठेबाजी जादा दराने विक्री बनावट अथवा निकृष्ट दर्जाच्या कृषी निविष्ठांची विक्री
शासनाच्या नियमांचे उल्लंघन
अशा कोणत्याही प्रकारचे गैरप्रकार आढळल्यास संबंधित विक्रेत्यांचे परवाने तात्काळ रद्द करण्यात येतील. गंभीर प्रकरणांमध्ये थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.
शेतकऱ्यांसाठी तक्रार निवारण कक्ष सुरू
खरीप हंगामात शेतकऱ्यांच्या अडचणी तातडीने सोडविण्यासाठी विभागीय स्तरावर तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.
शेतकऱ्यांनी खत, बियाणे, औषधे किंवा उपलब्धतेबाबतच्या तक्रारींसाठी खालील क्रमांकांवर संपर्क साधावा:
मोबाईल : 9421233270
टोल फ्री : 18002334000
जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी कृषी विभाग, महसूल यंत्रणा आणि खत विक्रेत्यांना या नव्या प्रणालीमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचे निर्देश दिले आहेत. गावपातळीपर्यंत जनजागृती करून प्रत्येक शेतकऱ्याला मोबाईल ॲपचा वापर समजावून सांगावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.
शेतकऱ्यांसाठी डिजिटल युगाची नवी सुरुवात
खत वितरणात पारदर्शकता, वेळेची बचत, साठ्याची अचूक माहिती आणि अनुदानित खतांचा गैरवापर रोखण्यासाठी सुरू होणारा हा प्रकल्प राज्यातील कृषी व्यवस्थेसाठी महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. पथदर्शी प्रकल्प यशस्वी झाल्यास भविष्यात ही प्रणाली संपूर्ण महाराष्ट्रात लागू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

