


छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस यांनी गोवंश तस्करीविरोधात मोठी धडक कारवाई करत अवैधरित्या जनावरांची वाहतूक करणाऱ्या ११ वाहन व चालकांचे परवाने निलंबित केले आहेत.
पोलीस अधीक्षक Prakash Jadhav यांच्या निर्देशानुसार ग्रामीण पोलिसांनी जिल्हाभरात विशेष मोहीम राबवून चोरट्या मार्गाने गोवंश वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई सुरू केली आहे. याअंतर्गत १९ वाहन व चालकांचे परवाने निलंबित करण्याचे प्रस्ताव प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे पाठविण्यात आले होते. त्यापैकी ५ वाहनांचे परवाने ३० दिवसांसाठी निलंबित करण्यात आले असून ६ चालकांचे वाहन चालविण्याचे परवाने ९० दिवसांसाठी रद्द करण्यात आले आहेत.
दिनांक १६ मे ते २६ मे २०२६ दरम्यान जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांनी संयुक्तपणे छुप्या मार्गांवर नाकाबंदी, गस्त व छापेमारी मोहीम राबवली. या कारवाईत २४ गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले असून ४४ आरोपींवर महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६, भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे.
या मोहिमेदरम्यान पोलिसांनी ४२ गोवंश जनावरे तस्करांच्या तावडीतून सुखरूप मुक्त केली, तर वाहनांमधून अत्यंत क्रूरतेने वाहतूक केली जात असलेली ६९ जनावरे जप्त करण्यात आली. अशा एकूण १११ जनावरांची सुटका करण्यात आली असून त्यांची अंदाजे किंमत ३३ लाख ९९ हजार २०० रुपये असल्याचे सांगण्यात आले.
तसेच १ हजार ९४५ किलो गोमांसासह एकूण ५५ लाख ४६ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मुक्त करण्यात आलेल्या जनावरांना पुढील संगोपनासाठी अधिकृत गोशाळांमध्ये पाठविण्यात आले आहे.
पोलीस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, गोवंश जनावरांची अवैध वाहतूक, कत्तल किंवा गोमांस विक्रीबाबत माहिती मिळाल्यास तात्काळ स्थानिक पोलीस ठाणे, पोलीस नियंत्रण कक्ष क्रमांक 0240-2381633 किंवा डायल 112 वर संपर्क साधावा. तसेच कोणत्याही परिस्थितीत कायदा हातात घेऊ नये, असेही आवाहन करण्यात आले आहे.

