मुंबई, (महाराष्ट्र न्यूज टाइम्स)दि. 21 : राज्यातील प्रशासन अधिक पारदर्शक, गतिमान आणि नागरिकाभिमुख करण्यासाठी ‘झिरो ब्युरोक्रसी’ची संकल्पना राबविण्याचा निर्धार व्यक्त करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाने ‘स्टार्टअप’प्रमाणे कार्य करण्याची गरज व्यक्त केली. सुलभ प्रक्रिया, पूर्वानुमेय आणि मानवी हस्तक्षेप कमी करून पात्र नागरिकांना थेट सेवा देणे हेच ‘झिरो ब्युरोक्रसी’चे मूळ तत्त्व असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
नागरी सेवा दिन 2026 आणि ‘राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा 2025-26’ अंतर्गत पारितोषिक वितरण सोहळ्यात ते बोलत होते. या सभारंभास कौशल्य, रोजगार उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, सामान्य प्रशासन विभागाचे सचिव पंकजकुमार तसेच पुरस्कारार्थी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रशासनातील नाविन्यपूर्ण उपक्रमांची ‘स्टार्टअप’शी तुलना करत, प्रत्येक विभागाने स्वतःकडे एक स्वतंत्र स्टार्टअप म्हणून पाहिले पाहिजे, असे सांगितले.
प्रशासकीय गतिमानता आणि नाविन्यपूर्ण उपक्रम पुरस्कार
मंत्रालयीन प्रशासकीय विभागाकडून येणारे प्रस्ताव अंतर्गत ‘ड्रोन आधारित देखरेख आणि डिजिटल डेटा मेंटेनन्स यंत्रणा’ यासाठी सचिव (कृषी व पदुम) डॉ. रामास्वामी एन. यांना पहिले पारितोषिक देण्यात आले. या प्रस्तावाची मूळ कल्पना साप्रविचे प्रधान सचिव डॉ. अतुल पाटणे यांची आहे. याच अंतर्गत ‘कार्यालयीन कामकाज सुधारणे’साठी मराठी भाषा सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांना द्वितीय क्रमांकाने गौरविण्यात आले.
राज्यातील सर्व मुख्यालयाच्या कार्यालयातून येणाऱ्या प्रस्तावामध्ये ‘शाश्वत मत्स्यव्यवसायाच्या विकासाकरिता व मत्स्यसंपदेचे संरक्षण/संवर्धन करण्याकरिता प्रस्तावित संयुक्त सागरी मत्स्यव्यवस्थापन’ साठी आयुक्त प्रेरणा देशभ्रतार आणि प्रधान सचिव डॉ. अतुल पाटणे यांना प्रथम पारितोषिकाने गौरविण्यात आले. झोपडपट्टीधारकांशी उत्तम संवादासाठी आणि त्यांचा सहभाग वाढविण्यासाठी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर या प्रस्तावांतर्गत मुख्य कार्यकारी अधिकारी (एसआरए) डॉ. महेंद्र कल्याणकर यांना द्वितीय क्रमांकांच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.
विभागीय स्तरावरील निवड समित्यांकडून प्राप्त होणाऱ्या प्रस्तावांतर्गत वनसंपदा, आयएफआर डॅशबोर्डकरिता आदिवासी विकास विभाग, तळोदाचे प्रकल्प अधिकारी अनय नवांदन यांना प्रथम, विविध योजनाकरिता जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल आणि करिश्मा नायर यांना द्वितीय पुरस्कार तर खत उपलब्धता पोर्टल (वाशिम) करिता कृषी विकास अधिकारी अभिजीत देवगिरकर यांना तृतीय पारितोषिक देण्यात आले.
महानगरपालिका स्तरावरून थेट प्रस्तावअंतर्गत कूल रुफकरिता आयुक्त सौम्या शर्मा आणि अमरावती मनपा आयुक्त वर्षा लढ्ढा यांना प्रथम, मनपा सेवा व्हॉट्सॲप व चॅटबॉटसाठी आयुक्त अमोल येडगे आणि आयुक्त जी. श्रीकांत यांना द्वितीय आणि ई-गर्व्हनन्सकरिता मीरा भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त राधाविनोद शर्मा यांना तृतीय पुरस्कार देण्यात आला.
सर्वोत्कृष्ट कल्पना/उपक्रम अंतर्गत शासकीय संस्थेसाठी सिकलसेल ॲनिमिया एलिमिनेशन मिशन 2025 (नंदुरबार) या प्रस्तावासाठी जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी आणि डॉ. वैभव सबनीस यांना प्रथम पुरस्कार, थ्रेड्स ऑफ चेंज (नवी मुंबई महानगरपालिका) साठी उपायुक्त स्मिता काळे यांना द्वितीय आणि बिंदू नामावली सॉफ्टवेअर (विभागीय आयुक्त कार्यालय, अमरावती) सहाय्यक आयुक्त वैशाली पाथरे यांना तृतीय पारितोषिक देण्यात आले.
सर्वोत्कृष्ट कल्पना/उपक्रमांर्तगत शासकीय अधिकारी या गटात ‘आम्हाला खेळू द्या’ या प्रस्तावासाठी छत्रपती संभाजीनगर मनपाचे विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांना प्रथम पुरस्कार तर ई-महसूल प्रणाली माहिती पुस्तिका (बुलढाणा) या प्रस्तावाकरिता उपजिल्हाधिकारी समाधान गायकवाड आणि सुजान सोळंके यांना द्वितीय पुरस्कार देण्यात आला.
सर्वोत्कृष्ट कल्पना/उपक्रमांर्तगत शासकीय कर्मचारी या गटात गव्हर्नमेंट ॲसेट मॅपिंग करिता महसूल सेवक, जिल्हाधिकारी कार्यालय अकोलाचे ऋषिकेश आंग्रे यांना प्रथम पुरस्कार, पाणंद रस्ता करिता कवठेमहांकाळ (जिल्हा सांगली)च्या मंडळ अधिकारी वैशाली शेंडगे-वाघमोडे यांना द्वितीय तर स्टेम एज्युकेशनसाठी जि. प. कन्या शाळा, अमरावतीचे सहशिक्षक वीरेंद्र ब्राम्हण यांना तृतीय पारितोषिक देण्यात आले.

