छत्रपती संभाजीनगर,( महाराष्ट्र न्यूज टाइम्स ) – धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव निमित्त संपूर्ण छत्रपती संभाजीनगर शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून विविध सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील विविध भागांमध्ये महाराजांच्या प्रतिमांचे पूजन, भव्य मिरवणुका, पोवाडे, व्याख्याने, रक्तदान शिबिरे तसेच युवकांसाठी प्रेरणादायी कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत.
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्य, धर्म आणि सर्वसामान्य जनतेच्या रक्षणासाठी अपार संघर्ष केला. त्यांच्या शौर्य, त्याग आणि विचारांचा आदर्श समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावा, या उद्देशाने जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात असल्याचे आयोजकांनी सांगितले.
दरम्यान, मध्यरात्री बारा वाजता हिंदवी स्वराज्य संघटना तर्फे फटाक्यांची आतषबाजी करून जयंती उत्सवाचा जल्लोषात प्रारंभ करण्यात आला. “जय शिवराय” आणि “धर्मवीर संभाजी महाराज की जय” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. यावेळी शिवप्रेमींनी मोठ्या उत्साहात सहभाग घेत महाराजांना अभिवादन केले.
त्यानंतर सकाळी संघटनेच्या वतीने विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांच्या नियोजनासाठी तयारीला प्रारंभ करण्यात आला. शहरातील विविध भागांमध्ये युवक मंडळे, सामाजिक संघटना तसेच शिवप्रेमी मोठ्या प्रमाणात जयंती उत्सवाच्या तयारीत सहभागी झाले आहेत.
या उत्सवामध्ये सर्व नागरिकांनी जात, धर्म आणि पक्षभेद विसरून मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजन समितीकडून करण्यात आले आहे. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे विचार नवीन पिढीपर्यंत पोहोचवून राष्ट्रप्रेम, स्वाभिमान आणि सामाजिक एकात्मतेची भावना दृढ करण्यासाठी हा उत्सव प्रेरणादायी ठरणार असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

