जिल्ह्यातील शाळांना आता २१ नोव्हेंबरपर्यंत दिवाळीची सुट्टी!
जिल्हा परिषद शिक्षण विभागाचा सुधारित निर्णय; २३ नोव्हेंबरपासून शाळा नियमित सुरू होणार
छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगरच्या शिक्षण विभागाने दिवाळीच्या सुट्टीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी २ नोव्हेंबर ते १९ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत दिवाळीची सुट्टी जाहीर करण्यात आली होती. मात्र, ३० ऑक्टोबर रोजी झालेल्या शिक्षण समितीच्या बैठकीत सुट्टीचा कालावधी वाढविण्यास मान्यता देण्यात आली आहे.
त्यानुसार आता जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा तसेच खासगी प्राथमिक व माध्यमिक शाळांना २ नोव्हेंबर ते २१ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत दिवाळीची सुट्टी राहणार आहे. २२ नोव्हेंबर रोजी रविवार असल्याने सोमवार, २३ नोव्हेंबर २०२६ पासून शाळा नियमितपणे सुरू होणार आहेत.
यासंदर्भात जिल्हा परिषद शिक्षण विभागाने ३० ऑक्टोबर रोजी अधिकृत पत्र जारी केले आहे. शिक्षण समितीच्या बैठकीतील मान्यतेनुसार सुट्टीच्या कालावधीत सुधारणा करण्यात आली असून, याबाबत सर्व गटशिक्षणाधिकारी आणि संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांना कळविण्यात आले आहे.
या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना दिवाळी सणानिमित्त अधिक दिवसांची सुट्टी मिळणार असून, विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना यामुळे दिलासा मिळाला आहे.
— महाराष्ट्र न्यूज टाइम्स



