प्रादर्शिक कला विभागात भरतनाट्यम कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
छत्रपती संभाजीनगर, दि. २८ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रादर्शिक कला विभागात इटलीच्या सुप्रसिद्ध भरतनाट्यम नृत्यांगना लुक्रेझिया मॅनिस्कोटी यांच्या एकदिवसीय नृत्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेला विभागातील तसेच इतर विभागांतील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
भारतीय नृत्यशैली आत्मसात करून देश-विदेशात भारतीय संस्कृतीची ओळख निर्माण करणाऱ्या लुक्रेझिया मॅनिस्कोटी या प्रभावी नृत्यांगना आहेत. कलेच्या माध्यमातून मानवी मूल्यांचे संवर्धन करण्याची जबाबदारी त्यांच्यासारखे कलावंत समर्थपणे पार पाडत आहेत, असे प्रतिपादन विभागाच्या प्रस्ताविकात डॉ. वैशाली बोदेले यांनी केले.
कार्यशाळेदरम्यान मॅनिस्कोटी यांनी विद्यार्थ्यांना भरतनाट्यममधील विविध नृत्यतंत्रांचे प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले. ‘नृत्य हा केवळ सादरीकरणाचा प्रकार नसून तो जीवनाचा अविभाज्य घटक आहे,’ असे त्यांनी सांगितले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीची वैशिष्ट्ये आणि तिच्या अभिव्यक्तीक्षमतेचा अनुभव घेता आला.
लुक्रेझिया मॅनिस्कोटी या पद्मश्री पुरस्कारप्राप्त भरतनाट्यम गुरू आद्यार के. लक्ष्मण यांच्या शिष्या आहेत. नृत्यांगना असण्यासोबतच त्या नाट्यकलाकार, संशोधक आणि अध्यापनतज्ज्ञ म्हणूनही कार्यरत आहेत. मिलान विद्यापीठातून त्यांनी साहित्य आणि भारतीयविद्या या विषयांत पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. भारतीय पारंपरिक सादरीकरण कला आणि पाश्चात्त्य नाट्यपरंपरा यांचा समन्वय साधत त्या भारत व युरोपमध्ये कलात्मक सादरीकरण, संशोधन आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीचे कार्य करतात. मिलान येथील अकादेमिया संगमच्या त्या संचालिका असून, त्यांच्या कलात्मक योगदानासाठी त्यांना विविध सन्मानांनी गौरविण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रेषित रुद्रवार यांनी केले, तर डॉ. गणेश शिंदे यांनी आभार मानले. यावेळी डॉ. गजानन दांडगे, सचिन शिंदे, डॉ. संतोष गालफाडे, डॉ. व्ही. सौम्याश्री, डॉ.राखी सलगर डॉ. स्मिता पांढरे डॉ. संजय सांगवीकर, प्रा. रमेश धोंडगे योगेश गच्चे श्री. संदीप बुरसे यांच्यासह विभागातील कर्मचारी उपस्थित होते.



