छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे मा. आयुक्त श्री. अमोल येडगे यांच्या आदेशानुसार, मा. अतिरिक्त आयुक्त-२ श्रीमती कल्पिता पिंपळे यांच्या मार्गदर्शनाखाली व वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. उज्वला भामरे यांच्या नेतृत्वाखाली HPV लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. दिनांक २६ ऑक्टोबर २०२६ रोजी वेणुताई चव्हाण हायस्कूलमधील २४ पात्र विद्यार्थिनींचे सिडको एन-८ येथील महानगरपालिका रुग्णालयात एचपीव्ही (ह्युमन पॅपिलोमा व्हायरस) लसीकरण करण्यात आले. एकाच वेळी एवढ्या मोठ्या संख्येने मुलींनी एचपीव्ही लसीकरण करून घेण्याची ही कौतुकास्पद बाब आहे. यावेळी उपरोक्त सर्व मुली, त्यांचे पालक, वर्गशिक्षक आणि मुख्याध्यापक यांचे अभिनंदन करण्यात आले.
किशोरवयीन मुलींमध्ये आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करणे, एचपीव्ही लसीकरणाबाबतचे गैरसमज दूर करणे आणि पात्र मुलींना लसीकरणासाठी प्रोत्साहित करणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. महानगरपालिकेच्या आरोग्य व शिक्षण विभागाच्या समन्वयातून राबविण्यात येणारा हा उपक्रम मुलींच्या आरोग्य संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरत आहे.
महानगरपालिकेच्या वतीने पालकांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी आपल्या पात्र मुलींचे (14 वर्ष पूर्ण ते 15 वर्ष पूर्ण न झालेल्या) एचपीव्ही लसीकरण करून घेण्यासाठी जवळच्या महानगरपालिका आरोग्य केंद्रास भेट द्यावी व आवश्यक मार्गदर्शन घेऊन लसीकरण करून घ्यावे.



