धुळे-सोलापूर महामार्गावरील कचनेर कमानीजवळील घटना; अर्धा तास उलटूनही संपर्क होत नसल्याने संताप
कचनेर : धुळे-सोलापूर महामार्गावरील कचनेर कमानीजवळ अपघातात नीलगाय जखमी होऊन पुलावरून खाली पडल्याची घटना समोर आली आहे. या घटनेला अर्धा तास उलटूनही वनविभागाच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क होत नसल्याने वन्यजीवांच्या संरक्षणासाठी जबाबदार असलेल्या यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
अपघातात जखमी झालेली नीलगाय मदतीच्या प्रतीक्षेत असताना वनविभागाला वारंवार फोन करूनही प्रतिसाद मिळत नसल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे. वन्यप्राण्यांच्या संरक्षणाची जबाबदारी असलेल्या विभागाने अशा आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ मदतीसाठी पुढे येणे अपेक्षित आहे.
दुसरीकडे, लाकडाच्या गाड्यांच्या हप्त्यांसाठी धावपळ करणाऱ्या वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना जखमी वन्यप्राण्याच्या मदतीसाठी फोन घेण्यास वेळ नाही का, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
जखमी नीलगायीला तातडीने उपचार मिळणार का? वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी पोहोचणार का? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
वन्यजीवांच्या संरक्षणासाठी केवळ नियम आणि कारवाई पुरेशी नाही, तर संकटाच्या वेळी तत्पर मदतही तितकीच महत्त्वाची आहे. संबंधित विभागाने या घटनेची तातडीने दखल घेऊन जखमी नीलगायीला उपचार मिळवून द्यावेत, अशी मागणी होत आहे.



