चार पोलीस ठाण्यांच्या हद्दीत पाच गुन्हे दाखल; ८ लाख २७ हजारांचा मुद्देमाल जप्त
छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात गोवंश तस्करी, अवैध कत्तल आणि गोमांसाच्या बेकायदेशीर विक्रीविरोधात छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांनी कारवाईचा वेग वाढविला आहे. २६ ऑक्टोबर रोजी देवगाव रंगारी, फुलंब्री, वडोदबाजार आणि वैजापूर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत करण्यात आलेल्या विविध कारवायांमध्ये ३० गोवंश जनावरांची सुटका करण्यात आली. तसेच ७० किलो गोमांस जप्त करण्यात आले. या कारवायांमध्ये एकूण ८ लाख २७ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, सात जणांविरुद्ध पाच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
देवगाव रंगारीत दोन कारवाया; १२ जनावरांची सुटका
देवगाव रंगारी पोलीस ठाण्याच्या हद्दीत २६ ऑक्टोबर रोजी दोन स्वतंत्र कारवाया करण्यात आल्या. पहाटे कुरेशी मोहल्ल्यातील एका पत्र्याच्या शेडमध्ये कत्तलीच्या उद्देशाने सात गोवंश जनावरे बांधून ठेवल्याचे आढळले. जनावरांना आखूड दोरीने बांधण्यात आले होते, तसेच चारा-पाण्याची योग्य व्यवस्था नव्हती. या प्रकरणी मोसीन मुसा कुरेशी आणि रियाज रौऊफ कुरेशी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
त्याच दिवशी सायंकाळी गायरान जमिनीवर आणखी पाच जनावरे अशाच परिस्थितीत आढळली. याप्रकरणी साहील गफार कुरेशी याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. दोन्ही कारवायांमध्ये १२ जनावरांची सुटका करण्यात आली असून, त्यांची अंदाजे किंमत १ लाख ७५ हजार रुपये आहे.
फुलंब्रीत पिकअपमधून जनावरांची वाहतूक
फुलंब्री ते छत्रपती संभाजीनगर मार्गावरील हॉटेल लोकमानसमोर बोलेरो पिकअपमधून गोवंश जनावरांची वाहतूक होत असल्याचे पोलिसांना आढळले. कारवाईदरम्यान एक लाल गाय, एक काळी गाय आणि दोन लहान रेडे अशी चार जनावरे ताब्यात घेण्यात आली.
या प्रकरणी वाहनचालक ज्ञानेश्वर विठ्ठल मोरे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. जनावरे आणि एमएच ०४ एफपी २८२३ क्रमांकाच्या पिकअप वाहनासह एकूण २ लाख ७७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
वडोदबाजारमध्ये १४ जनावरे ताब्यात
वडोदबाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नायगव्हाण फाटा येथे महिंद्रा मॅक्सिमो वाहनातून गोवंश जनावरांची वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले. वाहनात एक गाय आणि १३ वासरे अशी एकूण १४ जनावरे दाटीवाटीने बांधलेली होती. जनावरांना आखूड दोरीने बांधण्यात आले होते, तसेच चारा-पाण्याची व्यवस्था नव्हती.
या प्रकरणी शाहिद कासम शहा आणि शेख खालील शेख जिलानी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. एमएच ०३ एएएच ७८८७ क्रमांकाच्या वाहनासह एकूण ३ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
वैजापूरमध्ये ७० किलो गोमांस जप्त
वैजापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोमांसाच्या अवैध विक्रीविरोधात कारवाई करण्यात आली. कसई गल्ली येथील शफीक मस्जीद कुरेशी याच्याकडून विक्रीच्या उद्देशाने ठेवलेले अंदाजे ७० किलो गोमांस जप्त करण्यात आले. त्याची किंमत सुमारे ७० हजार रुपये आहे. याशिवाय दोन सुरे आणि एक वजनकाटा असा साहित्यसाठाही जप्त करण्यात आला. या प्रकरणात एकूण ७० हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आला.
३१ कोटींहून अधिकचा मुद्देमाल जप्त
ग्रामीण पोलिसांनी जानेवारी २०२६ ते २६ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत गोवंश जनावरांची बेकायदेशीर वाहतूक, अवैध कत्तलखाने आणि गोमांसाशी संबंधित एकूण १७६ गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणांत ३३७ आरोपींविरुद्ध कारवाई करण्यात आली. यावेळी ७९६ गोवंश जनावरांची सुटका, २६ हजार ४५२ किलो गोमांस जप्त, तसेच गुन्ह्यांमध्ये वापरण्यात आलेली १२८ वाहने जप्त करण्यात आली. या कारवायांमध्ये ३१ कोटी २५ लाख रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाने दिली.
पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यात गोवंश तस्करी, अवैध कत्तल आणि जनावरांवरील क्रूरतेविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. संशयित ठिकाणांवर छापे, वाहनांची तपासणी, नाकाबंदी आणि गस्तीद्वारे अशा प्रकारांना आळा घालण्याचे प्रयत्न सुरू असून, यापुढेही कारवाई सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.



