मुख्य जलवाहिन्यांवरील बेकायदेशीर जोडण्यांवर कारवाई; दंडात्मक कारवाईचा मनपा प्रशासनाचा इशारा
छत्रपती संभाजीनगर, दि. २२ ऑक्टोबर : शहरातील पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आणि पाणीचोरीला आळा घालण्यासाठी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने अनधिकृत नळजोडण्यांविरोधात धडक मोहीम राबविली. या कारवाईत मुख्य जलवाहिन्यांवरील एकूण २९ अनधिकृत नळजोडण्या खंडित करण्यात आल्या.
मनपा आयुक्त अमोल येडगे यांच्या आदेशानुसार आणि अतिरिक्त आयुक्त-२ कल्पिता पिंपळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. मुख्य जलवाहिन्यांमधून बेकायदेशीररीत्या पाणी घेतल्यामुळे शहराच्या नियमित पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने ही कारवाई केली.
दोन परिसरांत कारवाई
महानगरपालिकेच्या पथकाने कट-कट गेट परिसरातील हॉटेल शालिमारजवळ ४०० मिमी व्यासाच्या मुख्य जलवाहिनीवरून घेतलेली एक अनधिकृत नळजोडणी खंडित केली. तसेच पायलट बाबा नगरी आणि संतोषी माता नगर परिसरात २५० मिमी व्यासाच्या मुख्य जलवाहिनीवरील २८ अनधिकृत नळजोडण्यांवर कारवाई करण्यात आली.
मनपा प्रशासनाचा कठोर कारवाईचा इशारा
ही मोहीम कार्यकारी अभियंता दत्तात्रय गायकवाड, पथकप्रमुख रोहित इंगळे, उपअभियंते आनंद राजपूत व महेश चौधरी यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आली. यावेळी संबंधित अभियंते कल्याण सातपुते, अक्षय दुकले, पथकातील कर्मचारी आणि नागरी मित्र सुरक्षा पथकाचे सदस्य उपस्थित होते.
मुख्य जलवाहिन्यांमधून बेकायदेशीररीत्या पाणी उपसा करणे आणि पिण्याच्या पाण्याचा अपव्यय करणे खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा मनपा प्रशासनाने दिला आहे. शहरातील अनधिकृत नळजोडण्यांविरोधातील मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी अधिकृत नळजोडण्यांचा वापर करून पाणीपुरवठा व्यवस्थेला सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.



