शहरातील थकबाकीदारांना दणका; दर गुरुवार व शुक्रवारी जप्तीची कारवाई
छत्रपती संभाजीनगर, दि. २२ ऑक्टोबर २०२६ : शहरातील मालमत्ता कराच्या थकबाकीदारांविरुद्ध छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने धडक मोहीम राबविली. मनपा आयुक्त अमोल येडगे यांच्या आदेशानुसार तसेच अतिरिक्त आयुक्त कल्पिता पिंपळे आणि उपआयुक्त (कर निर्धारक व संकलक) विकास नवाळे यांच्या सूचनेनुसार शहरातील विविध झोनमध्ये थकबाकीदारांच्या मालमत्तांवर जप्तीची कारवाई करण्यात आली. या मोहिमेद्वारे सुमारे ४७.१४ लाख रुपयांचा मालमत्ता कर वसूल केल्याची माहिती महानगरपालिकेने दिली.
महानगरपालिकेच्या सर्व झोन कार्यालयांच्या पथकांनी दिवसभरात थकबाकीदारांविरुद्ध कारवाई केली. या मोहिमेत मालमत्ता सील करण्यासोबतच संबंधित मालमत्ताधारकांकडून थकीत कराची वसुली करण्यात आली. महानगरपालिकेने थकबाकी वसुलीसाठी कठोर भूमिका घेतली असून, यापुढेही ही मोहीम नियमितपणे सुरू राहणार आहे.
झोननिहाय वसुली
महानगरपालिकेच्या माहितीनुसार, झोन क्रमांक १ मध्ये दोन मालमत्ता सील करून एका मालमत्ताधारकाकडून १०.८० लाख रुपये वसूल करण्यात आले. झोन क्रमांक २ मध्ये दोन मालमत्ताधारकांकडून २ लाख रुपये, झोन क्रमांक ३ मध्ये एका मालमत्ताधारकाकडून १.४६ लाख रुपये, तर झोन क्रमांक ४ मध्ये एक मालमत्ता सील करून एका मालमत्ताधारकाकडून १.५५ लाख रुपये वसूल करण्यात आले.
झोन क्रमांक ५ मध्ये दोन मालमत्ता सील करून दोन मालमत्ताधारकांकडून ३.४६ लाख रुपये वसूल करण्यात आले. झोन क्रमांक ६ मध्ये एका मालमत्ताधारकाकडून १.४० लाख रुपये, झोन क्रमांक ७ मध्ये दोन मालमत्ताधारकांकडून २.२८ लाख रुपये, तर झोन क्रमांक ८ मध्ये एका मालमत्ताधारकाकडून ७२ हजार रुपये वसूल केल्याची माहिती देण्यात आली आहे.
दर गुरुवार आणि शुक्रवारी जप्ती मोहीम
मालमत्ता कराची थकबाकी असलेल्या नागरिकांनी तातडीने कर भरून कारवाई टाळावी, असे आवाहन मनपा आयुक्त अमोल येडगे यांनी केले आहे. यापुढे दर गुरुवार आणि शुक्रवारी थकबाकीदारांच्या मालमत्तांवर अशाच प्रकारे जप्तीची कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.
निवासी मालमत्तांच्या बाबतीतही नियमानुसार एका खोलीसह इतर स्थावर व जंगम मालमत्तांवर सील किंवा जप्तीची कारवाई करण्यात येऊ शकते, असे महानगरपालिकेने स्पष्ट केले आहे. त्यामुळे नागरिकांनी थकीत मालमत्ता कर वेळेत भरून अप्रिय कारवाई टाळावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.



