दिवाळीपूर्वी कर वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करा
मनपा , दि.14 ऑक्टोबर: दिवाळीपूर्वी सर्व बिल कलेक्टर यांनी मालमत्ता कराच्या बिलांचे वाटप पूर्ण करावे. तसेच नवीन कर आकारणीअंतर्गत निश्चित करण्यात आलेले डिमांड आणि वसुलीचे उद्दिष्टही दिवाळीपर्यंत पूर्ण करावे, असे निर्देश छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे आयुक्त अमोल येडगे यांनी दिले.
महानगरपालिकेच्या स्मार्ट सिटी कार्यालयात आज सकाळी ११ वाजता आयुक्त अमोल येडगे यांनी झोन क्रमांक १ ते १० मधील सहाय्यक आयुक्त, सर्व वसुली अधीक्षक आणि बिल कलेक्टर यांची संयुक्त बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी मालमत्ता कर वसुलीचा आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना वसुलीला गती देण्याच्या सूचना केल्या.
शहरातील सुमारे १ लाख ६७ हजार मालमत्ताधारकांकडे कराची थकबाकी असून, सुमारे १ लाख ४५ हजार मालमत्ताधारक नियमितपणे कर भरतात. या दोन्ही घटकांकडून कर वसुली प्रभावीपणे करण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत. तसेच नवीन कर आकारणी झालेल्या मालमत्तांचे डिमांड तयार करणे आणि त्यानुसार वसुली करणे यावर भर द्यावा, असे आयुक्तांनी सांगितले.
उद्दिष्टपूर्तीत कसूर केल्यास कारवाई
दिवाळीपूर्वी निश्चित केलेले वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करणे आवश्यक आहे. उद्दिष्टपूर्ती न झाल्यास कोणतीही कारणे ऐकून घेतली जाणार नाहीत. संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्यात येईल, असा इशाराही आयुक्त अमोल येडगे यांनी दिला.
कर न भरणाऱ्या थकबाकीदारांवर कठोर कारवाई
मोठ्या रहिवासी कर थकबाकीदारांना संधी देऊनही त्यांनी मालमत्ता कर न भरल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करावी. अशा थकबाकीदारांचा कचरा उचलण्याची सेवा बंद करण्यासह त्यांच्या पाणीपुरवठा खंडित करण्याची कारवाई करावी, अशा सूचना आयुक्तांनी दिल्या.
ओपन प्लॉटवरील कर व इतर आकारणी न भरल्यास संबंधित भूखंडावर नियमानुसार बोजा चढविण्याची कार्यवाही करावी. तसेच कर वसुलीसाठी शनिवारीही वसुली आणि सीलिंगची कारवाई सुरू ठेवावी, असे निर्देश त्यांनी दिले.

उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार
मालमत्ता कर वसुलीमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणारे बिल कलेक्टर, वसुली अधीक्षक तसेच बीआय यांचा आयुक्त अमोल येडगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याचात अभिमान भारसाकडे, रवींद्र परदेशी, परबल बकले, नासीर खान, श्रीपाद सुभेदार, सिद्धार्थ कलारे तसेच कर अधीक्षक मध्ये अविनाश मद्दी, इमारत निरीक्षक कुणाल भोसले आणि सहाय्यक आयुक्त अर्चना राजपूत यांच्या समावेश होता.



