छत्रपती संभाजीनगर : सार्वजनिक ठिकाणे आणि परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिकांमध्ये नागरी कर्तव्यांची जाणीव असणे आवश्यक आहे. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिकांच्या सहभागाशिवाय पर्याय नाही, असे प्रतिपादन छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आयुक्त अमोल येडगे यांनी केले.
स्वच्छतेबाबत जनजागृती करणे, तसेच विद्यार्थ्यांमध्ये नागरी कर्तव्यांची जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशाने नवखंडा महाविद्यालय येथे स्वच्छता जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मनपा आयुक्त अमोल येडगे उपस्थित होते. यावेळी उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) नंदकिशोर भोंबे, सहाय्यक आयुक्त लता पुजारी, जनसंपर्क अधिकारी अहमद तौसीफ, संबंधित अधिकारी व कर्मचारी, मौलाना आझाद महाविद्यालयाचे प्राचार्य
मखदूम फारुकी, नवखंडा महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या विद्या प्रधान, विद्यार्थी आदी उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना आयुक्त अमोल येडगे म्हणाले की, नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी महानगरपालिकेचे ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून काम करावे आणि आपल्या शाळा-महाविद्यालयांसह परिसरात स्वच्छतेचा संदेश पोहोचवावा. रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या तसेच ओला आणि सुका कचरा एकत्र देणाऱ्या नागरिकांमध्ये जनजागृती करून त्यांना योग्य कचरा व्यवस्थापनासाठी प्रोत्साहित करावे.
गार्बेज व्हल्नरेबल पॉइंट्स (GVP) बाबत नागरिकांची मानसिकता बदलणे गरजेचे आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी आणि नागरिकांनी पुढाकार घेऊन महानगरपालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
प्लास्टिकचा वापर पूर्णपणे बंद करून त्याऐवजी पर्यावरणपूरक पर्यायांचा अवलंब करावा. तसेच वृक्षारोपण करण्याबरोबरच लावलेल्या झाडांचे संगोपन आणि संवर्धन करणेही तितकेच महत्त्वाचे आहे, असे त्यांनी सांगितले. पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन करताना पाण्याचा अपव्यय करणाऱ्या नागरिकांवर महानगरपालिकेतर्फे दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी घनकचरा व्यवस्थापन आणि प्लास्टिकबंदीविषयक तयार केलेल्या पोस्टर प्रदर्शनाची आयुक्तांनी पाहणी केली. तसेच विद्यार्थ्यांनी स्वच्छतेचा संदेश देणारे पथनाट्य सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.



