स्वच्छतेसह गंभीर त्रुटी आढळल्या; २३ लाखांचा तेलसाठा जप्त, परवाना निलंबित
वैजापूर : वैजापूर येथील एका तेल पॅकिंग युनिटवर अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) पथकाने धडक कारवाई केली. अन्न सुरक्षा व स्वच्छतेच्या तपासणीदरम्यान युनिटमध्ये अनेक गंभीर त्रुटी आढळून आल्याने प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे.
तपासणीदरम्यान १० हजार ७९८ किलो रिफाइंड पामोलिन ऑईलचा साठा, अंदाजे २३ लाख रुपये किमतीचा, जप्त करण्यात आला. तसेच युनिटच्या अन्न सुरक्षा व्यवस्थापनाची तपासणी करण्यात आली असता केवळ ४२ टक्के गुण मिळाले. त्यामुळे संबंधित युनिट ‘नॉन-कम्प्लायन्स’ असल्याचे आढळून आले.
युनिटमध्ये स्वच्छता, अन्न सुरक्षा मानके आणि आवश्यक प्रक्रियेच्या पालनाबाबत त्रुटी आढळल्याचे तपासणीत समोर आले. या पार्श्वभूमीवर संबंधित अन्न परवाना निलंबित करण्यात आला आहे.
FDAच्या या कारवाईमुळे खाद्यतेल पॅकिंग व विक्री करणाऱ्या युनिटमध्ये अन्न सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन किती महत्त्वाचे आहे, हे पुन्हा अधोरेखित झाले आहे. जप्त करण्यात आलेल्या तेलसाठ्याबाबत पुढील नियमानुसार कार्यवाही केली जाणार आहे.



