छत्रपती संभाजीनगर, दि. ५ (प्रतिनिधी) — मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत राजकीय हालचालींना वेग आला आहे. महायुतीकडून सतीश चव्हाण यांची उमेदवारी निश्चित होऊन त्यांनी अर्ज दाखल केला आहे. त्याच पार्श्वभूमीवर माजी शिक्षणाधिकारी एम. के. देशमुख हे अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पदवीधर मतदारसंघातील उमेदवारांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
एम. के. देशमुख यांनी यापूर्वी विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश करण्याची तयारी केली होती. गेल्या विधानसभा निवडणुकीत औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून काँग्रेसने त्यांना उमेदवारी जाहीर केली होती. देशमुख यांनी निवडणुकीची मोठ्या प्रमाणावर तयारीही केली होती.
त्यावेळी भाजपचे अतुल सावे यांच्या विरोधात देशमुख यांच्यामुळे निवडणुकीत चुरस निर्माण होण्याची चर्चा होती. मात्र, ऐनवेळी काँग्रेसने उमेदवारीत बदल करत लहू शेवाळे यांना मैदानात उतरवले, त्यामुळे देशमुख यांची उमेदवारी मागे पडली.
आता मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याच्या त्यांच्या निर्णयामुळे निवडणुकीच्या राजकीय समीकरणात आणखी एक घटक समोर आला आहे. दरम्यान, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे दिलीप घुगे यांनीही आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ६ ऑक्टोबर असून, ७ ऑक्टोबर रोजी अर्जांची छाननी होणार आहे. त्यामुळे पुढील काही तासांत आणखी कोणकोणते उमेदवार मैदानात उतरतात, याकडे पदवीधर मतदारांचे लक्ष लागले आहे.



