छत्रपती संभाजीनगर : (महाराष्ट्र न्यूज टाइम्स प्रतिनिधी) हर्सूल परिसरातील रामेश्वर नगर, सोसायटी परिसर, फौजी कॉलनी, वडाच्या झाडाजवळील परिसर तसेच लगतच्या भागातील मुख्य व अंतर्गत रस्ते अरुंद झाल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. अनेक वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित असून, याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी परिसरातील समाजसेवक व जागरूक नागरिकांनी एकत्र येत महापौर तसेच नगरविकास मंत्र्यांकडे निवेदनाद्वारे गाऱ्हाणे मांडले आहे.
वडाच्या झाडाजवळील मुख्य रस्त्यावरून दररोज हजारो नागरिकांची ये-जा होत असते. या परिसरात मोठ्या प्रमाणात लोकवस्ती असून, वाहतुकीच्या तुलनेत रस्त्याची रुंदी अपुरी पडत आहे. त्यातच अंतर्गत रस्त्यांवर विविध ठिकाणी अतिक्रमणे झाल्याने रस्ते आणखी अरुंद झाले आहेत.
आपत्कालीन परिस्थितीतही अडचणीची शक्यता
रस्ते अरुंद झाल्यामुळे वाहतूक कोंडीसह नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. एखादी दुर्घटना किंवा आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास अग्निशमन दलाची मोठी गाडी अथवा रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो, अशी चिंता नागरिकांनी व्यक्त केली आहे.
रामेश्वर नगर, सोसायटी परिसर, फौजी कॉलनी व इतर भागांना जोडणारा वडाच्या झाडाजवळील मुख्य रस्ता नियमानुसार रुंद करावा. तसेच अंतर्गत रस्त्यांवरील अतिक्रमणे हटवून नागरिकांची होणारी गैरसोय दूर करावी, अशी मागणी जागरूक नागरिकांनी केली आहे.
प्रशासनाने या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेऊन प्रत्यक्ष पाहणी करावी आणि रस्ते रुंदीकरण व अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही लवकरात लवकर करावी, अशी अपेक्षा परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.



