फुलंब्री : (एस के शेख प्रतिनिधी) तालुक्यातील वडोद बाजार येथील सोमवारच्या आठवडी बाजारात जनावरांची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकऱ्यांसमोर जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे पुढील काळातील संकटाला सामोरे जाण्याच्या चिंतेने अनेक शेतकरी जनावरांची विक्री करण्यास मजबूर झाले आहेत.
पावसाअभावी पिकांचे नुकसान होत असतानाच जनावरांसाठी चारा आणि पाण्याची व्यवस्था करणे शेतकऱ्यांसाठी आव्हान ठरत आहे. जनावरे जोपासण्यासाठी आवश्यक असलेला खर्च वाढत असल्याने आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांकडून जनावरांची विक्री करण्याचा पर्याय स्वीकारला जात आहे.
चारा-पाणी उपलब्धतेबाबत पुरेसे नियोजन आणि मदत वेळेत उपलब्ध न झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शासनाने दुष्काळग्रस्त भागातील जनावरांसाठी चारा, पाणी तसेच आवश्यक पशुधन व्यवस्थापनाच्या उपाययोजना तातडीने कराव्यात, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
वडोद बाजारातील वाढलेली जनावरांची आवक ही ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या आर्थिक आणि पशुधनाशी संबंधित अडचणींचे गांभीर्य अधोरेखित करणारी ठरत आहे.



