| महाराष्ट्र न्यूज टाइम्स प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर शहरालगतच्या करोडी शिवारातील एका प्लास्टिक कंपनीला रात्रीच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. रात्री २ वाजून २७ मिनिटांच्या सुमारास ही आग लागल्याची माहिती आहे. आगीमध्ये कंपनीतील साहित्य जळून मोठे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
आगीची तीव्रता लक्षात घेता अग्निशमन विभागाला तातडीने माहिती देण्यात आली. घटनास्थळी पाच अग्निशमन बंब दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत आग नियंत्रणात आणली.
या दुर्घटनेत दोन जण भाजल्याची माहिती असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली, तसेच नुकसानीचा नेमका अंदाज किती आहे, याबाबत अधिकृत माहिती मिळणे बाकी आहे.
घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली. आगीच्या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.



