जटवाडा रोडवर फळांची हातगाडी लावण्याच्या कारणावरून झालेल्या वादाची तक्रार पोलिसांत केल्याच्या रागातून फळविक्रेत्यावर चौघांनी हल्ला केल्याची घटना हर्सूल परिसरात घडली. या हल्ल्यात फळविक्रेता आणि मध्यस्थी करण्यासाठी आलेला त्याचा भाऊ जखमी झाला असून, या प्रकरणी हर्सूल पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रहमान सुलतान पठाण (वय २६, रा. सावंगी, हर्सूल) हे जटवाडा रोड परिसरात फळांची हातगाडी लावतात. हातगाडी लावण्याच्या कारणावरून आरोपींनी रहमान यांना शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली होती. याबाबत रहमान यांनी ३० सप्टेंबर रोजी सायंकाळी बेगमपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.
तक्रार केल्याचा राग मनात धरून त्याच दिवशी रात्री साडेसातच्या सुमारास आरोपींनी रहमान यांना रस्त्यात गाठून मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी घनश्याम ऊर्फ गणू याने चाकूने रहमान यांच्या डाव्या हाताच्या दंडावर वार केला. भांडण सोडविण्यासाठी आलेले रहमान यांचे भाऊ फैसल पठाण यांच्यावरही चाकूने वार करण्यात आला. त्यांच्या बरगडीला दुखापत झाली.
घटनेनंतर दोन्ही जखमींना उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी गुन्हा क्रमांक ४५६/२०२६, कलम १०९(१), ३(५) भारतीय न्याय संहिता (BNS) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चारही आरोपी अटकेत
पोलिसांनी या प्रकरणातील चारही आरोपींना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये योगेश ऊर्फ भावड्या (२१), घनश्याम ऊर्फ गणू (२२), उस्मान ऊर्फ शब्द हमीद खान (२१) आणि चेतन किशोर चौधरी (२०) यांचा समावेश आहे. आरोपी हर्सूल परिसरातील रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, आरोपींपैकी दोघांविरुद्ध यापूर्वीही शरीराविरुद्धचे गुन्हे दाखल असून, त्यांच्याविरुद्ध कलम १२९ भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) अन्वये प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
या घटनेचा पुढील तपास हर्सूल पोलीस करीत आहेत.



