विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करून वाचन संस्कृती विकसित करण्याच्या उद्देशाने छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या सात शाळांमध्ये ‘एक तास वाचन’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी लोक कल्याण अभियानांतर्गत मनपा आयुक्त अमोल येडगे यांच्या सूचनेनुसार या उपक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे.
मनपा केंद्रीय प्राथमिक शाळा सिडको एन-७, नारेगाव, मुकुंदवाडी, हर्सूल, इंदिरानगर-बायजीपुरा, अशोकनगर आणि बनेवाडी या सात शाळांमध्ये आठवड्याच्या प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या इयत्तांसाठी एक तास वाचनाचे नियोजन करण्यात आले आहे. सोमवारी इयत्ता दुसरी व तिसरी, मंगळवारी चौथी व पाचवी, बुधवारी सहावी, गुरुवारी सातवी, शुक्रवारी आठवी आणि शनिवारी नववीच्या विद्यार्थ्यांसाठी वाचन सत्र घेण्यात येते.
शाळेतील वाचनालय व ग्रंथालयां मध्ये विद्यार्थी पुस्तके, विविध ग्रंथ, मासिके, वर्तमानपत्रे तसेच पाठ्य पुस्तकांचे वाचन करीत आहेत. वाचनानंतर १५ मिनिटे शिक्षक व मुख्याध्यापक विद्यार्थ्यांशी वाचलेल्या साहित्यावर संवाद साधतात. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण होण्या सोबतच आकलन क्षमता व विचारशक्ती विकसित होण्यास मदत होत आहे.
या उपक्रमांतर्गत आज सातही शाळांमधील एकूण २१० इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी एक तास वाचनाचा सहभाग घेतला.
आयुक्त अमोल येडगे यांच्या आदेशानुसार, अतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील आणि उपआयुक्त तथा शिक्षण विभाग प्रमुख अंकुश पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम अधिकारी ज्ञानदेव सांगळे यांनी उपक्रमाचे नियोजन केले आहे. मुख्याध्यापक संतोष तपकिरे, संपत ईधाते, जगन्नाथ सपकाळ, तिलोत्तमा मापारी, अशोक उदावंत, प्रवीण नरवाडे, मनोज अग्रवाल तसेच संबंधित शाळांतील सर्व शिक्षक उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करीत आहेत.



