फुलंब्री : (एस के शेख फुलंब्री प्रतिनिधी) तालुक्यातील पिंपळगाव वळण तसेच रेलगाव फाटा परिसरात दुष्काळी परिस्थितीची पाहणी जालना–छत्रपती संभाजीनगरचे खासदार मा. डॉ. कल्याण काळे यांनी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची प्रत्यक्ष पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला.
दुष्काळामुळे शेतीपिकांचे झालेले नुकसान, पाण्याची उपलब्धता तसेच शेतकऱ्यांसमोरील विविध अडचणी याबाबत शेतकऱ्यांनी खासदार काळे यांच्याशी चर्चा केली. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दुष्काळ निधी व आवश्यक मदत मिळवून देण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
पिंपळगाव वळण येथेही खासदार काळे यांनी अनेक शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या समस्या मांडून पुढील नियोजनाबाबत विनंती केली. शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेत त्यांच्या समस्या निवारणासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन खासदारांनी दिले.
यावेळी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष संदीपदादा बोरसे पाटील, तालुकाध्यक्ष संतोष पाटील मेटे, काँग्रेसचे उपाध्यक्ष जगन्नाथ शेठ काळे, बिल्डा गावचे सरपंच सोमीनाथ पाटील मते, उपसरपंच फैय्याज भाई शहा, देवगिरी सहकारी साखर कारखान्याचे संचालक ज्ञानेश्वर पाटील मते, सरपंच गोविंद पाटील गायकवाड यांच्यासह परिसरातील शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते.
दुष्काळी परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्याने शासनाकडून आवश्यक मदत मिळण्याची अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली.



