विद्यार्थ्यांसह प्रवाशांचा जीव वाचला; बसच्या देखभालीबाबत विद्यार्थ्यांचा सवाल
कन्नड : फुलंब्रीहून कन्नडकडे येणाऱ्या एसटी बसचा मागील टायर अचानक निघाल्याने कुंजखेडा-दाभाडी रस्त्यावर गुरुवारी (२४ सप्टेंबर) मोठा अपघात होता-होता टळला. चालकाने प्रसंगावधान राखत बसवर नियंत्रण मिळवल्याने बसमधील विद्यार्थी व प्रवासी सुखरूप बचावले.
MH 20 BL 2198 क्रमांकाची ही बस फुलंब्रीहून जैतखेडा, हिवरखेडा (ना.) मार्गे कुंजखेडा येथील मदरसा परिसरातून विद्यार्थी व प्रवाशांना घेऊन कन्नडकडे येत होती. कुंजखेडा-दाभाडी रस्त्यावर बस धावत असताना अचानक मागील टायर निघाला. मात्र चालकाने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तत्काळ बस नियंत्रित केल्याने संभाव्य मोठी दुर्घटना टळली.
घटनेनंतर बसमधील विद्यार्थ्यांनी कन्नड बसस्थानकाशी संपर्क साधून पर्यायी बसची मागणी केली. मात्र सुमारे एक ते दीड तास बस उपलब्ध न झाल्याने विद्यार्थ्यांना मोठी गैरसोय सहन करावी लागली. काही विद्यार्थ्यांनी खासगी वाहनांचा आधार घेतला, काहींनी पालकांना फोन करून दुचाकी मागवून घेतली, तर काही विद्यार्थ्यांना पायीच घर गाठावे लागले.
बसच्या देखभालीबाबत प्रश्नचिन्ह
या घटनेमुळे एसटी बस मार्गावर सोडण्यापूर्वी तिची नियमित देखभाल व तांत्रिक तपासणी कितपत केली जाते, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. विशेषतः टायर, ब्रेक, स्टीयरिंग तसेच अन्य महत्त्वाच्या यंत्रणांची तपासणी वेळोवेळी होणे आवश्यक असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.
विद्यार्थ्यांची सुरक्षित बसची मागणी
कन्नड व परिसरातील अनेक गावांमधून विद्यार्थी कुंजखेडा येथे शाळा, महाविद्यालय, डी.एड., बी.एड., डी.फार्मसी, बी.फार्मसी तसेच BUMS शिक्षणासाठी नियमित ये-जा करतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून प्रत्येक बस फेरी सुरू करण्यापूर्वी मेकॅनिककडून ब्रेक, स्टीयरिंग, टायर व इतर महत्त्वाच्या भागांची तपासणी करूनच बस मार्गावर सोडावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.
तसेच बसमध्ये अचानक बिघाड झाल्यास विद्यार्थ्यांना तासन्तास पर्यायी वाहतुकीची प्रतीक्षा करावी लागू नये, यासाठी पर्यायी बस वेळेत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही विद्यार्थ्यांच्या वतीने करण्यात आली आहे.
दरम्यान, चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळल्याने बसमधील सर्व प्रवासी सुखरूप असल्याचे सांगण्यात आले.



